गेल्या सरकारच्या काळातील पदोन्नती वादाच्या भोवऱ्यात

सरकारने कोणतीही चौकशी लावावी- फडणवीस
मुंबई- देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळातील अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीसंदर्भातील एक निर्णय वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे. अन्न आणि नागरी पुरवठा विभागाच्या 39 अधिकाऱ्यांची पदोन्नती निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी अवघ्या तीन तास आधी केल्याचा आक्षेप घेण्यात आला आहे. ही पदोन्नती नियमबाह्य असल्याचा आरोप 4 विभागातील पुरवठा निरीक्षकांनी केला आहे. महत्वाची बाब म्हणजे, या पदोन्नतीत विदर्भातील अधिकाऱ्यांचं लॉबिंग असल्याचाही आरोप करण्यात येत आहे.
अन्न आणि नागरी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांची पदोन्नती संदर्भात बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘या सरकारने कुठलीही चौकशी लावावी. त्यांनी उगाच घाबरवण्याचा प्रयत्न करू नये. फक्त माध्यमांना बातम्या देऊन आमच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जातोय. जर चौकशीतून काही गैर आढळलं तर निश्चित कारवाई करावी.’ पदोन्नती करताना अमरावती, नागपूर विभागातील अधिकाऱ्यांना झुकतं माप दिलं गेल्याचंही सांगण्यात येत आहे. त्यामुळे विदर्भातील अधिकाऱ्यांची लॉबिंग असून कोकण, नाशिक, औरंगाबाद, पुणे विभागाला डावलण्यात आल्याचा विभागातील पुरवठा निरीक्षकांचा आरोप आहे.
दरम्यान या प्रकरणी अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचेकडे तक्रार करण्यात आली आहे. तसेच माहिती अधिकारातंर्गत ही बाब निदर्शनास आल्याचा विभागातील निरिक्षकांचा दावा आहे. एवढचं नाहीतर पदोन्नती देताना आर्थिक गौरव्यवहार झाल्याचाही गंभीर आरोप केला जात आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून पदोन्नती थांबविण्याची मागणीही जोर धरू लागली आहे.





