एका व्यक्तीच्या बढतीने संपूर्ण समुदायाचा विकास होत नाही; मुर्मू यांच्याबाबत यशवंत सिन्हांची भूमिका

नवी दिल्ली – एखाद्या समुदायातील एखाद्या व्यक्तीची बढती झाली अथवा प्रगती झाली याचा अर्थ संपूर्ण त्या समुदायाचा विकास झाला असे होत नाही, अशी टिप्पणी माजी केंद्रीय मंत्री आणि विरोधी पक्षांचे संयुक्त उमेदवार यशवंत सिन्हा यांनी केली आहे. काल राष्ट्रपती पदासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांच्याबाबत बोलत होते.
सिन्हा म्हणाले की, पाठिंबा असणाऱ्यांची संख्या ही बदलत जाणारी असती आणि 18 जुलैपर्यंत तुम्हाला यात बदल झालेला दिसेल. तसेच यावेळी त्यांच्यात आणि मुर्मू यांच्यात काय फरक आहे याकडेही लक्ष वेधले. तुम्ही प्रत्येक वेळी विजयीच होणार असा विचार करून तुम्ही लढण्यासाठी जाऊ शकत नाही. काही वेळा लढण्यावर तुमचा विश्वास असतो म्हणूनही तुम्ही लढत असतात.
त्यामुळे लढणे हे माझ्यासाठी महत्वाचे आहे. तसेच संख्याबळ ही बदलत जाणारी स्थिती असते अन् ती बदलेल असा आपल्याला विश्वास असल्याचे त्यांनी नमूद केले. आज जे दिसतेय कदाचित ते चित्र 18 जूलै रोजी असणार नाही असे सांगतानाच भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा देण्यापेक्षा आम आदमी पार्टी आपल्याला पाठिंबा देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आप भाजपला मत देईल असे मला वाटत नाही. मी कोणत्याही पक्षाचा नाही. मी तृणमुल कॉंग्रेसचा राजीनामा दिला आहे. दूसऱ्या बाजूला तुम्हाला भारतीय जनता पार्टीचा पूर्ण पाठिंबा असलेला उमेदवार समोर दिसतो आहे. त्यामुळे निष्पक्ष उमेदवार आणि भाजपचा उमेदवार यात तुम्हाला निवड करावी लागणार आहे.





