कास्यंपदक विजेता स्वप्निल यास पदोन्नती; मुंबई रेल्वे विभागात विशेष अधिकारी म्हणून बढती

पुणे – पुणे रेल्वे विभागातील वरिष्ठ तिकिट तपासणीस स्वप्निल कुसाळे पॅरिस ऑलंपिकमध्ये भारताचे नेतृत्व करत आहे. या ऑलंपिकमध्ये त्याने कास्यंपदक पटकविले आणि मध्य रेल्वेकडून त्याला पदोन्नती देत त्याची मुंबई रेल्वे विभागात विशेष अधिकारी म्हणून पदोन्नतीने बदली करण्यात आली आहे.
पुणे रेल्वे विभागामध्ये विविध पदावर नेमणुकीस असलेले १२४ खेळाडू आहेत. त्यामध्ये सर्वाधिक खेळाडू हे फ्री स्टाईल रेसलिंग आणि रायफल शुटिंग या दोन प्रकारामध्ये आहेत. रायफल शुटिंग प्रकारातच स्वप्निल कुसाळे याने देशाला कास्य पदक मिळवून दिले आहे. स्वप्निल कुसाळे हा रेल्वेमध्ये २०१५ मध्ये भरती झाला, पुणे रेल्वे विभागात नेमणुकीला होता.
नियमानुसार खेळाडूंना ३३० दिवस काम आणि ३५ दिवस सुट्टी दिली जाते. त्यानुसार कुसाळे हा बालेवाडी येथील शुटींग रेंज येथे सराव करत होता. दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून त्याची पदोन्नती रखडली होती. ती त्याने पदक जिंकल्यानंतर तत्काळ देण्यात आली. पुणे रेल्वे विभागाच्या व्यवस्थापक इंदु दुबे यांनी कुसाळे यांचे अभिनंदन करत पदक जिंकल्याचा अभिमान असल्याचे म्हटले आहे.
पुणे रेल्वे विभागात १२४ खेळाडू…
पुणे रेल्वे विभागातील विविध पदावरील रेसलिंगमध्ये ५० खेळाडू आहेत. तर, शुटिंगमध्ये आठ, ऍथलेटिक खेळात सहा, बॅडमिंटन, बॉक्सिंग, बॉडी बिल्डींग, फुटबॉल, महिला क्रिक्रेट, पुरूष क्रिकेट प्रत्येकी तीन, पुरुष हॉकी, सायकलिंग, व्हॉलीबॉल पुरुष प्रत्येकी पाच, गोल्फ एक, व्हॉलीबॉल पुरुष आणि महिला १५, कबड्डी २, वेटलिफ्टिंग एक, वॉटर पोलो ५, चेस एक अशा खेळाडूंचा समावेश आहे. रेल्वेकडून नियमितपणे खेळाडूंना प्रोत्साहन दिले जाते. सध्या रेल्वेत असलेल्या खेळाडूंना सर्व सवलती दिल्या जात असल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.





