nagar | आयुक्तांनी दिलेली आश्वासने पुराच्या पाण्यात….!

नगर, (प्रतिनिधी) – शहरातील नैसर्गिक ओढे- नाल्यांवर झालेले अतिक्रमण व पक्की बांधकामे, बंद पाईप टाकून बुजवलेले ओढे-नाले व वळवलेले प्रवाह यासंदर्भात महापालिका आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी दिलेल्या आश्वासनांकडे दुर्लक्ष केल्याने शहरातील पुराचा व ओढे-नाले तुंबून लोकांच्या घरात पाणी घुसण्याचा धोका अधिक वाढला आहे.
पावसाळा सुरु झाला परंतु अतिक्रमणे हटली नाहीत, नैसर्गिक ओढे-नाल्यांवरील अतिक्रमणे व बांधकामे जोमाने सुरू आहे. अधिकारी लोकांचीच बांधकामासाठी संमत्ती असल्याचे आरोप होत आहे. दरवर्षी पावसाळ्यापूर्वी हा प्रश्न नागरिक संघटना उपस्थित करतात. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समिती, उपलोकायुक्तांपुढे विषय मांडले गेले.
महापालिकेने अहवाल सादर करत ओढे-नाल्यांवरील अतिक्रमण व बांधकामे हटवण्याचे, बंदिस्त व वळवलेले प्रवाह मोकळे करण्याचे आश्वासन दिले, लेखी हमी दिली मात्र प्रत्यक्षात कोणतीच कार्यवाही न करता आयुक्त जावळे यांनी हा प्रश्न प्रलंबित ठेवला आहे.
नागरिक कृती मंचचे अध्यक्ष शशिकांत चंगेडे या प्रश्नावर गेल्या काही वर्षापासून पाठपुरावा आहेत. महापालिकेने स्वतःच केलेल्या सर्वेक्षणात शहराच्या विविध भागात ९५ किमी. लांबीचे ४१ नैसर्गिक ओढे-नाले बंदिस्त झाल्याचे आढळले तसेच शहरात १४० ठिकाणी पाणी तुंबत असल्याचे आढळले. मात्र बांधकामे, अतिक्रमणे हटवणे, पाईप टाकून अडवलेले प्रवाह मोकळे करण्यासाठी कोणतीही कार्यवाही केलेली नाही. परिणामी एखाद्या जोरदार पावसात सहाराच्या व्यवस्थेची दाणादाण उडते,य पार्श्वभूमीवर नागरी वसाहती तुंबलेले पाणी घुसून साहित्याचे नुकसान होण्याचा धोक यंदाही कायम आहे.
पावसाळा सुरु झाला परंतु अतिक्रमण ‘जैसी थे वैसे’ आहे. महापालिका दरवर्षी नालेसफाईवर ५४ लाख रुपये खर्च करते, प्रत्यक्षात बांधकामे व अतिक्रमणे, बंदिस्त केलेले प्रवाह, वळवलेले प्रवाह यामुळे नैसर्गिक ओढे-नाले यांचं अस्तित्वातच संपले आहे. सन १९७२ च्या विकास आराखड्यावर नैसर्गिक ओढे-नाल्यांची नोंद आहे.
हा आराखडाच महापालिकेकडे नाही. तो कुठे गेला? त्याच्या चोरीची फिर्याद मनपा का देत नाही? ओढे-नाल्यांवरील अतिक्रमणे हटवावीत, कागदपत्रे उपलब्ध करावीत यासाठी २४ जूनला आयुक्तांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले जाणार आहे. शशिकांत चंगेडे, अध्यक्ष, नागरिक कृती समिती





