Nevase News : नेवाशात बेकायदेशीर धंद्यांचा सुळसुळाट; एसपी मुम्मका सुदर्शन यांच्या भूमिकेकडे लक्ष
Nevase News : सुदर्शन यांनी पदभार स्वीकारताच अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये धास्ती निर्माण झाल्याचे चित्र आहे.

नेवासे : अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी जिल्हा पोलीस प्रमुखपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यावर विशेष भर दिला आहे. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी जिल्हा पोलीस दलातील स्थानिक गुन्हे शाखेत बदल करत गुन्हेगारी आणि अवैध धंद्यांविरोधात कडक भूमिका घेतल्याची चर्चा आहे. कडक शिस्त आणि धडाकेबाज कार्यपद्धतीमुळे त्यांचा जिल्ह्यात मोठा दरारा निर्माण झाल्याचे बोलले जात आहे.
सुदर्शन यांनी पदभार स्वीकारताच अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये धास्ती निर्माण झाल्याचे चित्र आहे. त्यांच्या कारवाईमुळे अनेक ठिकाणी अवैध व्यवसायांवर आळा बसल्याची चर्चा असून, जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात सध्या जिल्हा पोलीस प्रमुख मुम्मका सुदर्शन यांच्या कार्यपद्धतीची चर्चा सुरू आहे. त्यांच्या कार्यकाळात पुन्हा एकदा खाकी वर्दीची शान उंचावल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे.
आंध्र प्रदेशातील कडपा येथील मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या मुम्मका सुदर्शन यांनी अभियांत्रिकीची पदवी घेतल्यानंतर स्पर्धा परीक्षेतून भारतीय पोलीस सेवेत प्रवेश केला. नागपूर येथे कार्यरत असताना त्यांनी अमली पदार्थ आणि हुक्का पार्लरविरोधात विशेष मोहीम राबवत आपली वेगळी ओळख निर्माण केली. सर्वसामान्यांना व्यसनमुक्तीच्या दिशेने प्रवृत्त करण्यासाठीही त्यांनी विशेष प्रयत्न केले.
त्यानंतर चंद्रपूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत असताना स्थानिक गुन्हेगारी आणि माफियांविरोधात त्यांनी कठोर कारवाई केल्याची चर्चा होती. या कारवायांमुळे पोलीस दलाची प्रतिमा उंचावण्यास मदत झाली. त्यामुळेच आता अहिल्यानगर जिल्ह्यातही अवैध धंदे चालकांमध्ये त्यांच्या नावाची धास्ती असल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, जिल्हा पोलीस अधीक्षकपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर काही दिवसांतच नेवासा पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक महेश पाटील यांची नगर येथे बदली करण्यात आली, तर त्यांच्या जागी पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांची नेवासा पोलीस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली.
मात्र, नेवासा शहरासह तालुक्यात मटका, जुगार, बेकायदा दारू विक्री, अवैध प्रवासी वाहतूक, वाळूतस्करी आणि बिंगो जुगारासारखे अवैध धंदे पुन्हा सुरू असल्याच्या तक्रारी व चर्चा नागरिकांमधून होत आहेत. या पार्श्वभूमीवर संबंधित अवैध धंद्यांवर तातडीने कारवाई करून त्यांचा पूर्णपणे नायनाट करावा, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून केली जात आहे.
अवैध धंद्यांना प्रोत्साहन मिळत असल्याच्या तक्रारींमुळे जिल्हा पोलीस प्रशासनाच्या प्रतिमेवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी आता नेवासा तालुक्यातील परिस्थितीकडे विशेष लक्ष देत कठोर कारवाईचे ‘सुदर्शन चक्र’ फिरवावे आणि अवैध धंद्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांमधून जोर धरत आहे.
जिल्हा पोलीस प्रमुखांनी लक्ष घालण्याची मागणी
जिल्हा पोलीस अधीक्षकांनी आता आपले ‘सुदर्शन चक्र’ नेवाश्यात वेगाने फिरून येथे पोलिसांच्याच नाकावर टिचून सुरु झालेले हे अवैद्ध धंदे पुन्हा चालू करणाऱ्यांचा ‘प्रताप’ हाणून पाडण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी आपले सुदर्शन चक्र वेगाने फिरविण्याची अत्यंत गरज निर्माण झालेली असून वेळोवेळी नेवाश्यात बदनाम झालेल्या या खाकी वर्दीची शान आणि रुबाब वाढविण्यासाठी जिल्हा पोलीस प्रमुखांनी लक्ष घालण्याची मागणीही आता सुज्ञ नेवासकरांतून केली जात आहे.





