Uday Samant : ‘रत्नागिरीतील प्रकल्प प्रदूषण विरहित’ – उदय सामंत

रत्नागिरी – रत्नागिरी तालुक्यातील झाडगाव आणि वाटद येथे उभारण्यात येणाऱ्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) अंतर्गत वेल्लोर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी पार्क कंपनीचा सिलिकॉन वेफर्स, फॅब, एटीएमपी या प्रकल्पाबरोबर रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचा एरोस्पेस आणि संरक्षण क्षेत्रातील साहित्य निर्मितीच्या अशा २९ हजार ५५० कोटींच्या प्रकल्पाला राज्य शासनाने मंजुरी दिली आहे.
या प्रकल्पाच्या माध्यमातून रत्नागिरी जिल्ह्यातील २० हजारपेक्षा जास्त बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होणार आहे. हे दोन्ही प्रकल्प प्रदूषण विरहित असणार आहेत, अशी माहिती उद्योग मंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सामंत म्हणाले, या दोन्ही प्रकल्पांच्या माहितीसाठी रत्नागिरीमध्ये एक कार्यालय उघडून या प्रकल्पांची माहिती देण्यात येणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यात प्रथमच एवढे मोठे प्रकल्प येत आहेत. या प्रकल्पांचे स्वागत रत्नागिरीकरांनी केले पाहिजे.
वेल्लोर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी पार्क कंपनीचा सेमी कंडक्टर बनवण्याचा प्रकल्प आहे. यातून कोणतेही प्रदूषण होणार नाही. तसेच रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर या अनिल अंबानी यांच्या कंपनीमार्फत धीरुभाई अंबानी यांच्या नावाने एरोस्पेस आणि संरक्षण क्षेत्रातील साहित्य बनवणे हा प्रकल्प उभारण्यात येत आहे.
दोन्ही प्रकल्पासाठी २९ हजारपेक्षा जास्त गुंतवणूक केली जात आहे. स्टरलाइट कंपनीच्या झाडगाव येथील जागेवर प्रकल्प उभारण्यात येणार आहे. एक हजार एकर जमिनीवर प्रकल्प उभारण्यात येणार असून ही जमीन अद्यापही एमआयडीसीच्या नावावर आहे. त्यामुळे या प्रकल्पाला विरोध करण्याचा प्रश्नच येत नाही असेही सामंत यांनी सांगितले.





