Project Freedom: अमेरिका-इराण यांच्यातील सुरू असलेला संघर्ष संपवण्यासाठीच्या वाटाघाटी अंतिम टप्प्यात आहेत. दरम्यान, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी होर्मुझच्या सामुद्रधुनीबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. अमेरिकेच्या अध्यक्षांनी मध्यपूर्वेतील व्यापारी जहाजांचे संरक्षण करणाऱ्या ‘प्रोजेक्ट फ्रीडम’ या नौदल मोहिमेला तात्पुरती स्थगिती दिल्याची घोषणा केली आहे. मात्र, त्यांनी “इराणच्या बंदरांवरील अमेरिकेची नाकेबंदी सुरूच राहील.” असेही म्हटले आहे. आपल्या ‘ट्रुथ’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील एका पोस्टमध्ये ट्रम्प यांनी या त्यांच्या मोठ्या निर्णयाविषयी माहिती दिली. आपल्या पोस्टमध्ये त्यांनी, “एका करारासंदर्भात इराणी प्रतिनिधींसोबत चर्चा पुढे सरकत आहे.” असे म्हटले आहे. पुढे ट्रम्प यांनी दावा केला की, “इराणसोबतचा करार अंतिम करण्यासाठीची मोहीम ‘प्रोजेक्ट फ्रीडम’ त्यांनी तात्पुरती थांबवली आहे.” ट्रम्प काय म्हणाले? Project Freedom: डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या पोस्टमध्ये, “इराणविरुद्धच्या मोहिमेत मिळालेल्या प्रचंड लष्करी यशाच्या आधारावर, पाकिस्तान आणि इतर देशांच्या विनंतीनुसार, तसेच शांतता करारासंदर्भात इराणी प्रतिनिधींसोबत झालेल्या चांगल्या चर्चेनंतर, आम्ही परस्पर सहमतीने ठरवले आहे की नाकेबंदी पूर्णपणे लागू राहील, परंतु करार अंतिम होऊ शकतो का हे पाहण्यासाठी ‘प्रोजेक्ट फ्रीडम’ काही काळासाठी थांबवला जाईल.” अशी माहिती दिली आहे. Project Freedom: ऑपरेशन ‘प्रोजेक्ट फ्रीडम’ काय आहे? Project Freedom: इराणसोबत वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणारा सुरक्षित व्यापार पुन्हा सुरू करण्याच्या उद्देशाने ट्रम्प प्रशासनाने ‘प्रोजेक्ट फ्रीडम’ ही लष्करी मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेचा उद्देश सामुद्रधुनीतून आंतरराष्ट्रीय व्यापारी जहाजांचा सुरक्षित मार्ग सुनिश्चित करणे हा आहे. अमेरिकेचा आरोप आहे की, इराणने गेल्या काही आठवड्यांत जहाजांवर वारंवार हल्ले केले आहेत. होर्मुझची सामुद्रधुनी हा एक महत्त्वाचा मार्ग आहे, कारण जगातील जवळपास एक पंचमांश तेल याच मार्गाने जाते. त्यामुळे, तिची सुरक्षा संपूर्ण जगासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. अमेरिकेने या मोहिमेसाठी एक मोठे लष्करी दल तैनात केले आहे, ज्यामध्ये १५,००० हून अधिक सैनिक, क्षेपणास्त्रवाहू विनाशक जहाजे, हेलिकॉप्टर आणि १०० हून अधिक विमानांचा समावेश आहे.