Satara | जिल्ह्यात प्लाझ्मा, बीम लाइट, लेझरच्या वापरास प्रतिबंध

सातारा, (प्रतिनिधी) – प्लाझ्मा, बीम लाइट आणि लेझर बीम लाइटच्या प्रखर प्रकाशामुळे नागरिकांच्या डोळ्यांना इजा होण्याचा धोका असल्याने जिल्ह्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये या लाइटचा वापर करण्यास मनाईचा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी आदेश जारी केला आहे.
गणेश विसर्जन मिरवणुकीत मंडळांचे कार्यकर्ते सहभागी होतात. त्याचबरोबर मिरवणूक पाहायला गणेशभक्तांची गर्दी होते.
त्यामध्ये लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांचाही समावेश असतो. प्लाझ्मा, बीम लाइट व लेझरच्या प्रखरतेमुळे नागरिकांच्या डोळ्यांना इजा होण्याचा धोका आहे.
त्यामुळे जिल्ह्यामध्ये दि. 12 ते दि. 18 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत गणेश मंडळांच्या कार्यक्रमात, विसर्जन मिरवणूकीत, गणेश मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते किंवा कार्यक्रमांच्या आयोजकांनी या लाइटचा वापर करू नये.
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 मधील कलम 163 प्रमाणे या लाइटच्या वापरास प्रतिबंध आहे, असे डुडी यांनी या आदेशात म्हटले आहे.





