Jamkhed News : प्रा. राम शिंदेंच्या पाठपुराव्याला यश! करमाळा-जामखेड ४० कि.मी. मार्गाचे रुपडे बदलणार; ३०० कोटींचा निधी
Jamkhed News : रस्त्याच्या रखडलेल्या कामामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. मात्र, आता हा रस्ता चकाचक होणार असल्याने परिसरातील व्यापार, शेती आणि रोजगाराला मोठी चालना मिळणार आहे.

जामखेड : कर्जत-जामखेड मतदारसंघातील दळणवळणाला नवी दिशा देणारा अत्यंत महत्त्वाचा आणि ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून दुरवस्थेमुळे चर्चेत राहिलेल्या करमाळा–जामखेड राज्यमार्ग क्र. ५६ च्या सुधारणा आणि रुंदीकरणाच्या कामाला अखेर गती मिळाली असून, पहिल्या टप्प्यात तब्बल ४० किलोमीटर लांबीच्या सिमेंट काँक्रीट रस्त्यासाठी अंदाजे ३०० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यातून हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मार्गी लागला आहे.
‘महाराष्ट्र अमृत काल रस्ते विकास योजना (टप्पा १)’ अंतर्गत या प्रकल्पाचा समावेश करण्यात आला आहे. आशियाई विकास बँकेच्या (ADB) अर्थसाहाय्य योजनेतून या रस्त्याला प्राधान्य देऊन काम हाती घेतले जात आहे. करमाळा ते जामखेड दरम्यानचा हा ४० कि.मी.चा जुना मार्ग आता १० मीटर रुंदीच्या उच्च दर्जाच्या सिमेंट काँक्रीट रस्त्यामध्ये रूपांतरित केला जाणार आहे. भविष्यात हा मार्ग करमाळा, जामखेडसह सोलापूर, अहिल्यानगर आणि बीड या जिल्ह्यांना अधिक सक्षमपणे जोडणारा मुख्य विकासमार्ग ठरणार आहे.
सध्या या रस्त्याची अवस्था अत्यंत खराब झाली असून, याच मार्गावरून शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, दुग्ध व्यावसायिक, शेतकरी आणि कृषी मालाची मोठी वाहतूक होते. पोथरे, जवळा, नान्नज, बोर्ले, झिक्री यांसारखी महत्त्वाची गावे आणि ‘ब’ वर्ग दर्जा लाभलेले प्रसिद्ध तीर्थक्षेत्र व पर्यटन स्थळ ‘जवळा’ याच मार्गावर असल्याने या रस्त्याला प्रचंड महत्त्व आहे. रस्त्याच्या रखडलेल्या कामामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. मात्र, आता हा रस्ता चकाचक होणार असल्याने परिसरातील व्यापार, शेती आणि रोजगाराला मोठी चालना मिळणार आहे.
प्रमुख गावांच्या ठिकाणी १४ मीटर रुंदी व आधुनिक बसथांबे (Jamkhed News )
या प्रकल्पाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे, मार्गावरील प्रमुख गावांच्या आणि फाट्यांच्या ठिकाणी रस्त्याची रुंदी थेट *१४ मीटर* करण्यात येणार आहे. यामध्ये प्रामुख्याने:
पोथरे
जवळा
बोर्ले फाटा
नान्नज
झिक्री
पाडळी फाटा
या गावांमध्ये अत्याधुनिक बसथांबे आणि प्रवाशांसाठी विशेष सुविधा निर्माण केल्या जातील. तसेच रस्त्यावरील पाण्याचा योग्य निचरा व्हावा आणि रस्ता खराब होऊ नये, यासाठी दोन्ही बाजूंना सिमेंट काँक्रीटची बांधीव गटारे (Storm Water Drains) तयार करण्यात येणार आहेत.
या महत्त्वापूर्ण निर्णयाबद्दल प्रा. राम शिंदे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री . एकनाथरावजी शिंदे, उपमुख्यमंत्री श्रीमती. सुनेत्राताई पवार तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री मा. ना. श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांचे कर्जत-जामखेड मतदारसंघातील जनतेच्या वतीने मनःपूर्वक आभार मानले आहेत.
“कर्जत-जामखेड मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी दळणवळण सक्षम करणे हे आमचे ध्येय आहे. हा रस्ता जनतेच्या रोजच्या जिव्हाळ्याचा विषय होता. या ऐतिहासिक निर्णयामुळे नागरिकांचा प्रवास सुरक्षित, जलद आणि दर्जेदार होईल. मतदारसंघाला न्याय दिल्याबद्दल महायुती सरकारचे मनःपूर्वक आभार.”
– प्रा. राम शिंदे (सभापती, महाराष्ट्र विधानपरिषद)





