पुणे जिल्हा | उद्यान कचऱ्यापासून कांडी कोळशाची निर्मिती

जळोची, {दिगंबर पडकर} – प्रदूषण टाळण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने घालून दिलेल्या नियमानुसार बारामती नगरपालिकेने आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने सार्वजनिक उद्यानात निर्माण होणाऱ्या कचऱ्यांपासून ‘कांडी कोळसा’ प्रकल्प उभारला आहे. हा राज्यातील पहिलाच प्रकल्प असून, दररोज दोन ते अडीच टन ‘कांडी कोळसा’ तयार केला जात आहे. या प्रकल्पातून बारामती नगरपालिकेच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात भर पडत आहे.
राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत बारामती शहर हे अनेक बाबींमुळे वैशिष्ट्यपूर्ण आहे. बारामतीत असणाऱ्या शैक्षणिक सुविधा व वास्तव्यासाठी पोषक वातावरण असल्याने बारामती शहरात मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात शहरीकरण वाढले आहे. हे शहरीकरण वाढत असतानाच प्रत्येक नागरिकाला मूलभूत सुविधा देण्याचे नेटके नियोजनही केल्याचे दिसून येते. बारामती शहरात वाढत्या शहरीकरणाबरोबरच निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे व्यवस्थापनही बारामती नगरपालिकेकडून योग्यरित्या केले जात आहे.
बारामती नगरपालिकेच्या हद्दीत २७ लहान, मोठे सार्वजनिक उद्याने आहेत. शहरातील रस्त्यांच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणावर झाडे आहेत. या ठिकाणी निर्माण होणारा तसेच नागरिकांच्या घराशेजारील झाडांचा पाला पाचोळा, झाडांच्या फांद्या, नारळाच्या झावळ्या आदी कचऱ्याचे संकलन केले जाते.
हा कचरा सात दिवसांसाठी वाढविण्यात येतो. या वाळलेल्या कचऱ्यापासून दोन ते अडीच टन कांडी कोळसा उत्पादित केला जातो. ४० एम.एम. व्यासाचे व १० ते ४० सें.मी. लांबीचा ‘कांडी कोळसा’ तयार केला जातो. नगरपालिकेच्या उत्पन्नात अधिकची भर पडत आहे.
प्रकल्प खर्च..
विद्युत बिल – प्रतिदिन अंदाजित ८० युनिटस् नुसार सरासरी रुपये १,२००/- प्रतिदिन, मासिक वीजबिल अंदाजे ३५,०००/- ते ४०,०००/-
मनुष्यबळ – ३ – मासिक सरासरी रुपये ६०,०००/-
एकूण खर्च – रुपये ९५,०००/- ते रुपये १,००,०००/-
प्रकल्पातून मिळणारे उत्पन्न
प्रतिदिन २.५ टन कांडी कोळसा उत्पादन.
कांडी कोळसा प्रतिटन रुपये ६,५००/-
खर्च वगळून नगर परिषदेस प्रति महिना रुपये ३,५०,०००/-
साखर कारखाने, कंपन्यामधील लहान मोठे बॉयलरसाठी जळाऊ इंधन म्हणून वापर होतो.
कांडी कोळसा प्रकल्पामुळे उद्यानांमधून निर्माण होणाऱ्या प्रश्न कचऱ्याचा प्रश्न सुटण्यास मदत होईल. शिवाय या प्रकल्पामुळे नगरपालिकेला आर्थिक फायदाही मिळणार आहे. – महेश रोकडे, मुख्याधिकारी बारामती नगरपालिका.
दिवसेंदिवस वेगवेगळ्या प्रकारच्या कचऱ्याची समस्या निर्माण होत आहे. उद्यानातून निर्माण होणाऱ्या कचऱ्यापासून कांडी कोळश्यामार्फत नगरपालिकेला उत्पन्नाचा स्त्रोत मिळाला आहे. ही चांगली गोष्ट आहे.
केशव जाधव, नागरिक बारामती.





