Pimpri : कचऱ्यातील नारळापासून कोकोपीट खताची निर्मिती

तळेगाव दाभाडे : तळेगाव दाभाडे नगरपरिषदेमार्फत शहरातील कचऱ्याचे व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी जमा झालेल्या कचऱ्यातील नारळ वेगळे करून मोरखळा कचरा डेपो येथे कोकोपीट तयार करण्याचे काम यशस्वीरीत्या सुरू करण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक व उपमुख्याधिकारी ममता राठोड यांनी दिली.
सदर उपक्रमामध्ये जमा झालेल्या कचऱ्यातील नारळ वेगळे करून मोरखळा कचरा डेपो येथे कोकोपीट तयार करण्याचे काम यशस्वीरीत्या सुरू झाले आहे. दररोज प्राप्त होणारे नारळ श्रेडर मध्ये क्रश करून बारीक करण्यात येतात. यामध्ये कोकोपीटचे फायदे देखील नमूद केले आहे. या खताच्या वापरामुळे मातीची गुणवत्ता सुधारते, मातीतील आर्द्रता टिकवून ठेवणे व तिच्या हवेच्या व पाण्याच्या वहन क्षमतेत सुधारणा करते, पाणी साठवण्याची क्षमता चांगली असल्याने कमी पाण्यात पीक उगवता येते. सेंद्रिय आणि पर्यावरणपूरक असल्याने कोकोपीट पर्यावरणास अनुकूल रहाते.
तयार झालेले कोकोपीट हे नगरपरिषद उद्यान विभागामार्फत शहरातील उद्यानांमध्ये साध्या खत म्हणून वापरले जात आहे. तसेच उर्वरित कोकोपीट नागरिकांना विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. इच्छुक नागरिकांनी नगरपरिषद कार्यालय मोरखळा येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प केंद्राला संपर्क करावा असे आवाहन प्रशासना कडून करण्यात आले आहे.
सर्व नागरिकांनी घरातील नारळाचा कचरा इतर ओल्या-सुक्या कचऱ्यापासून वेगळा करून तो घंटागाडीमध्ये जमा करावा. हा उपक्रम पर्यावरणपूरक तत्त्वांवर आधारित असून यामुळे शहर स्वच्छ व सुंदर बनविण्याच्या प्रयत्नात यश मिळेल.
– विजयकुमार सरनाईक, मुख्याधिकारी, तळेगाव नगरपरिषद
कोकोपीट खताचा वापर
अनेक लोक झाडांच्या वाढीसाठी विविध प्रकारची खते वापरतात, पण झाडाची वाढ होत नाही. अनेक वेळा रासायनिक खतांच्या वापरामुळे झाडे मरतात. अशा परिस्थितीत जर तुम्हाला झाडाची वाढ वाढवायची असेल तर तुम्ही कोकोपीट खताचा वापर करू शकता. कोकोपीट हे नारळाच्या शेंड्यापासून तयार केले जाते. याला कॉयर म्हणूनही ओळखले जाते. झाडाच्या वाढीसाठी या खतामध्ये इतर काही पोषक घटकही मिसळले जातात.





