नेवासा येथे रामनवमीच्या पूर्वसंध्येला “जय श्री राम”चा जयघोष करत मिरवणूक

नेवासा: श्रीरामचंद्रांच्या रामनवमी उत्सवानिमित्त नेवासेतील श्री रामराज्य उत्सव समितीने 5 एप्रिल रोजी सायंकाळी भव्य शोभायात्रा काढली. रविवारी (दि. 6) रामनवमी आहे. पूर्वसंध्येला मोठ्या संख्येने भाविक मिरवणूकीत सहभागी झाले होते. “जय श्रीराम”, “सियावर रामचंद्र की जय”च्या जयघोषाने नेवासेनगरी दुमदुमली. मळगंगा देवी मंदिरापासून सुरू झालेल्या या शोभायात्रेचं पूजन व महाआरतीने स्वागत केलं.
मिरवणुकीत प्रभू रामचंद्रांची ८ फुटी मूर्ती, भारतमातेची प्रतिमा आणि राम-सीता-हनुमानाच्या वेशातील बालकांचा देखावा आकर्षण ठरला. भगव्या झेंड्यांनी सजलेल्या मार्गावर तोफांच्या सलामीने स्वागत झालं. संत भास्करगिरीजी महाराज, नारायणगिरी महाराजांसह अनेक मान्यवरांनी सहभाग घेतला. हनुमान चालिसा आणि भक्तिगीतांवर रामभक्तांनी ठेका धरला.
५५० वर्षांनंतर अयोध्येत राममंदिर साकारल्याचा उत्साह या मिरवणुकीत दिसला. चौकाचौकात रांगोळ्या, शिवकालीन खेळांची प्रात्यक्षिकं आणि भगव्या वस्त्रातील युवकांनी वातावरण भक्तिमय केलं. मोहिनीराज मंगल कार्यालयात प्रसाद वाटप झालं. पोलिस अधीक्षक राकेश ओला, अप्पर अधीक्षक वैभव कल्लूबर्मे, शेवगाव विभागाचे उपअधीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नेवासा स्टेशनचे परिविक्षाधीन उपअधीक्षक संतोष खाडे, निरीक्षक धनंजय जाधव व सहकारी,अधिकाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला. समितीच्या प्रयत्नांनी मिरवणूक शांततेत पार पडली.





