बालवाडी शिक्षक सुविधांपासून वंचित

सिंहगडरस्ता : सिंहगड रस्त्यावरील वडगाव बुद्रुक येथील पुणे महानगरपालिकेच्या बालवाडी शिक्षकांच्या व्यथेतून बालवाडी शिक्षकांच्या समस्येंचे वस्ताव समोर आले आहे. अतिशय तुटपुंज्या मानधनावर ते ज्ञानदानाचे काम करीत आहेत. शालेय साहित्य, स्टेशनरी याचा नेहमीच तुटवडा असतो एवढेच काय तर झाडू, पायपुसणे अशा वस्तुही स्वखर्चातून आणाव्या लागत आहेत.
वडगाव बुद्रुक परिसरातील महानगरपालिकेची बालवाडी ही गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी परिसरात प्रसिद्ध आहे, त्यामुळे येथे प्रवेशासाठी झुंबड उडते. येथील शिक्षक आणि शिकवण्याची पद्धत यामुळे महापालिकेची असुनही या शाळेला प्राधान्य देणाऱ्या पालकांची संख्या मोठी आहे.
कोरोना काळामध्ये या बालवाडी शिक्षिकांनी पीपीइ किट घालून डॉक्टरांच्या बरोबरीने अखंड काम केले आहे. त्यातही तुटपुंजे मानधन दिले जात आहे. यूातन महागाईच्या काळात घरखर्च कसा भागवायचा अशी चिंता या शिक्षिकांना आहे. साधारण, 15 ते 20 वर्षांपासून शिक्षिका एकवट मानधन योजनेअंतर्गत शिक्षिकेचे काम करीत आहेत. परंतु, त्यांना भविष्य निर्वाह निधी, मेडिकल सुविधा, सुट्ट्या, सातवा वेतन आयोग अशा कोणत्याही सुविधा दिल्या जात नाहीत. काही शिक्षिका निवृत्तीच्या उंबरठ्यावर असताना त्यांनाही या सुविधा आपणास लवकरच मिळतील अशी आशा आहे.
एकवट रोजगार शिक्षकांचे आणि सेविकांचे प्रश्न महापालिकेकडे गेल्या अनेक वर्षापासून आम्ही मांडत आलो आहोत. मागच्या आठवड्यात आयुक्त बिनवडे यांच्याबरोबर बैठक झाली असून त्यांनी आमच्या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
– उदय भट, अध्यक्ष, कामगार युनियन, पुणे मनपा
एकवट मानधनाच्या नावाखाली अनेक बालवाडी शिक्षिकांची महापालिकेतर्फे वर्षानुवर्षे पिळवणूक होत आहे. समान काम-समान वेतन, किमान वेतन कायद्यानुसार यांना मोबदला मिळालाच पाहिजे. मानवी हक्काचे उल्लंघन आहे यासाठी न्यायालयात दाद मागता येईल.
– विकास कुचेकर, मानवी हक्क व संरक्षण समिती
एकवट रोजगार कामगारांचा प्रश्नाबाबत मनपा प्रशासन गंभीर आहे आणि लवकरच त्या बाबतीत सकारात्मक निर्णय आम्ही घेऊ. बालवाडी शिक्षिकांना त्यांना त्याच्याबाबतच्या सूर्व सुविधा मिळतील, यासाठी प्रयत्नशील आहे.
– बिनवडे, अतिरिक्त आयुक्त





