प्रो-कबड्डी लीग | पाटणा पायरेट्स अंतिम फेरीत

बेंगळुरू – प्रो-कबड्डी लीगमध्ये बुधवारी झालेल्या उपांत्य फेरीच्या पहिल्या सामन्यात पाटणा पायरेट्सने बलाढ्य युपी योद्धाचा पराभव केला व थाटात अंतिम फेरीत प्रवेश केला. या सामन्यात पाटणा संघाने युपी संघाचा 38-27 असा पराभव करताना युपीचा स्टार खेळाडू व डुबकी किंग प्रदीप नरवालवर संपूर्ण वर्चस्व गाजवले व त्याचा प्रभाव कमी करण्यात यश मिळवले.
या स्पर्धेत सातत्याने रेड व टॅकल गुणांत आघाडी घेतलेल्या नरवालला या सामन्यात केवळ 4 गुण मिळवता आले. तसेच यंदाच्या स्पर्धेत भरात असलेल्या सुरींदर गीलही साफ अपयशी ठरला. पाटणा संघाचे आक्रमण युपी संघाला थोपवताच आले नाही व त्यांना पराभव पत्करावा लागला.
पाटणाकडून गुमान सिंग, सचिन व सुनील यांनी अफलातून आक्रमण करत युपी संघाला दडपणाखाली राखले व संघाला विजय प्राप्त करुन दिला.
पाटणा व युपीच्या रेड गुणांमध्ये फारसा फरक नव्हता मात्र, पाटणाने टॅकल गुण 16 तर युपीने केवळ 9 नोंदवलेय ऑलआऊट गणही पाटणाने 6 तर युपीने केवळ 2 मिळवले व हाच या दोन संघातील निर्णायक फरक ठरला.





