प्रियंका गांधींना नाकारले; “लडकी हूँ, लढ सकती हूँ’ला सपशेल अपयश

नवी दिल्ली – कॉंग्रेस पक्षाला नवसंजीवनी मिळविण्यासाठी प्रियंका गांधींना नेतृत्व द्यावे यासाठी कॉंग्रेस पक्षात जबरदस्त घमासान सुरु होते. किंबहुना ती कॉंग्रेसची शेवटची आशा होती. मात्र तीच आशा उत्तर प्रदेशच्या निकालाने घोर निराशेत रूपांतरित झाली. यामुळे उत्तर प्रदेशमध्ये “लडकी हूँ, लढ सकती हूँ’ची झालेली अवस्था सबंध देशात कॉंग्रेस पक्षाला घोर निराशा देणारी आहे.
2022च्या यूपी विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसने 30 वर्षांनंतर प्रियंकांच्या नेतृत्वाखाली सर्व 403 जागांवर उमेदवार उभे केले. “लडकी हूँ, लढ सकती हूँ’ अशा घोषणा देत प्रियंका गांधींनी 40% महिलांना तिकिटे वाटली. मात्र, गेल्या विधानसभा निवडणूक निकालापेक्षाही कॉंग्रेसची कामगिरी वाईट झाली. यावेळी पक्ष 403 जागांपैकी केवळ 2 जागांवर आघाडीवर आहे. यावरून राज्यातील जनतेने प्रियांकाच्या नेतृत्वाला नाकारल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे त्यांचे राजकीय पदार्पण सुपरफ्लॉप ठरले आहे.
गेल्या 17 वर्षांपासून कॉंग्रेसच्या राजकारणाचा मोठा चेहरा असलेल्या प्रियंका यांना 2019मध्ये राष्ट्रीय सरचिटणीस बनवण्यात आले. कॉंग्रेसचे बुडते जहाज त्या किनाऱ्यावर घेऊन जातील, असे सर्वांना वाटत होते. पण 2022च्या निवडणुकीने सर्व आशा धुळीस मिळवल्या. जवळपास दोन दशके जपून ठेवलेले कॉंग्रेसचे ट्रम्प कार्ड पहिल्याच डावात अपयशी ठरले आहे.





