प्रियांका गांधींची ‘या’ पक्षाच्या अध्यक्षांशी चर्चा; विरोधी नेत्यांच्या उंचावल्या भुवया

लखनौ – कॉंग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी आज लखनौ विमानतळावर भारतीय राष्ट्रीय लोकदल पक्षाचे अध्यक्ष जयंत चौधरी यांच्याशी चर्चा केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. चौधरी यांच्या पक्षाशी समाजवादी पक्षाबरोबर आघाडी झाल्याची घोषणा कालच अखिलेश यादव यांनी केली होती. त्यामुळे या भेटीला विशेष महत्त्व आहे.
गोरखपूरच्या प्रतिज्ञा मेळाव्यानंतर प्रियंका गांधी लखनौवरून दिल्लीला जाणारे विमान पकडण्यासाठी विमानतळावर आल्या असताना त्यांची योगायोगानेच जयंत चौधरी यांची भेट झाली. तथापि, त्यानंतर मात्र हे नेते छत्तीसगड सरकारच्या चार्टर्ड विमानाने एकत्रच दिल्लीला गेले.
त्यामुळे या चर्चेला अधिकच उधाण आले. त्यावर भाष्य करताना राष्ट्रीय लोकदल पक्षाचे उत्तर प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष मसुद अहमद म्हणाले, या घटनेतून कोणताही राजकीय अर्थ काढण्याची गरज नाही. आमची समाजवादी पक्षाशी निवडणूक आघाडी निश्चीत झाली आहे आणि आम्ही एकत्रच लढणार आहोत.





