प्रियांका गांधी यांनी सोडला सरकारी बंगला

नवी दिल्ली – कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी-वढेरा यांनी गुरूवारी देशाच्या राजधानीतील सरकारी बंगला सोडला. त्यांनी सरकारी बंगला खाली करताना मोदी सरकारकडून देण्यात आलेल्या मुदतीचे पालन केले.
प्रियांका दिल्लीतील 35, लोधी इस्टेट बंगल्यात राहत होत्या. स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपची (एसपीजी) सुरक्षा पुरवण्यात आली असल्याने त्यांना तो सरकारी बंगला देण्यात आला. मात्र, सरकारने मागील वर्षी प्रियांका यांच्याबरोबरच कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि त्या पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची एसपीजी सुरक्षा काढून घेतली. त्याऐवजी त्यांना झेड प्लस दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आली.
एसपीजीची सुरक्षा नसल्याने सरकारी बंगल्यासाठी पात्र नसल्याची नोटीस केंद्रीय नगरविकास मंत्रालयाने प्रियांका यांना 1 जुलैला बजावली. त्यांना महिनाभरात सरकारी बंगला सोडण्यास सांगण्यात आले. त्यानुसार प्रियांका यांनी सरकारी बंगला सोडला. त्यांनी बंगल्याच्या चाव्या केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पथकाकडे सुपूर्द केल्या.
प्रियांका यांनी कुठलीही थकबाकी ठेवली नसल्याचे समजते. आता त्या काही दिवस गुडगांवमधील त्यांच्या पेंटहाऊसमध्ये राहणार आहेत. त्यानंतर त्या मध्य दिल्लीत राहण्यासाठी जातील. तिथे त्यांनी भाड्याचे घर निश्चित केले आहे. त्या घराच्या नुतनीकरणाचे काम सध्या सुरू आहे.





