Priyanka Gandhi : त्रुटींवर चर्चा करण्यास केंद्राची टाळाटाळ; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
विद्यार्थी आंदोलकांवर झालेल्या लाठीमार आणि अश्रूधुराच्या वापरावरून काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी वाड्रा (Priyanka Gandhi) यांनी केंद्र सरकारवर जोरदार प्रहार केला आहे.

Priyanka Gandhi : विद्यार्थी आंदोलकांवर झालेल्या लाठीमार आणि अश्रूधुराच्या वापरावरून काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी -वाड्रा (Priyanka Gandhi) यांनी केंद्र सरकारवर जोरदार प्रहार केला आहे.
शिक्षण धोरणातील गंभीर त्रुटींवर चर्चा करण्यास सरकार टाळाटाळ करत असून उलट आपल्याच देशाच्या भवितव्यावर आणि मुलांवर पोलिसांकरवी लाठीमार करत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.
‘कॉकरोच जनता पार्टी’च्या संसदेवर धडक देण्याच्या आवाहनानंतर आणि कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या उपोषणामुळे चिढलेले हजारो विद्यार्थी व निदर्शकांनी संसदेच्या दिशेने कूच केले. कडक पोलीस बंदोबस्त व कडेकोट बॅरिकेड्स भेदून आंदोलक पुढे सरकत असताना सुरक्षा दलांनी त्यांच्यावर अश्रूधूर आणि लाठीमार केला, ज्यामुळे मध्य दिल्लीत प्रचंड गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
संसद भवन परिसरात पत्रकारांशी बोलताना प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) म्हणाल्या, हे अत्यंत हास्यास्पद आहे. ही आपलीच मुले आहेत आणि संसद त्यांचीच आहे; ती कोणाची वैयक्तिक जहागीर नाही. शिक्षण क्षेत्रातील प्रश्न आणि परीक्षांमधील गैरव्यवहारांवर राहुल गांधी सातत्याने आवाज उठवत आहेत. त्यावर चर्चा करण्याऐवजी सरकार अहिंसक आंदोलकांवर बळाचा वापर करत असल्याचे प्रियांका म्हणाल्या.
आंदोलकांनी अंतर्गत मार्गांचा वापर करत संसद परिसर गाठण्याचा प्रयत्न केला. पटेल चौक, शास्त्री भवन आणि पार्लमेंट स्ट्रीट पोलीस ठाण्याजवळ आंदोलक आणि पोलिसांमध्ये झालेल्या चकमकीत अनेक जण जखमी झाले.
सुरक्षेचा उपाय म्हणून संपूर्ण परिसरात इंटरनेट सेवा खंडित करण्यात आली. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी या मुद्द्यावरून विरोधकांनी केलेल्या तीव्र गदारोळामुळे लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज वारंवार (Priyanka Gandhi) तहकूब करावे लागले.






