Priyanka Chopra: बॉलिवूड आणि हॉलिवूडमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री प्रियंका चोप्रा सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. अलीकडेच तिने एका पॉडकास्टमध्ये मुलगी मालती मेरी चोप्रा जोनस हिला सार्वजनिक जीवनापासून दूर का ठेवते, याबद्दल खुलासा केला. मुलीची सुरक्षा आणि खासगी आयुष्य जपणे हीच आपली सर्वात मोठी प्राथमिकता असल्याचे तिने स्पष्ट केले. प्रियंका चोप्राने २०१८ मध्ये अमेरिकन गायक निक जोनस याच्याशी विवाह केला. २०२२ मध्ये सरोगसीच्या माध्यमातून त्यांच्या आयुष्यात मुलगी मालतीचा जन्म झाला. मालतीच्या जन्मानंतर प्रियंका आणि निक दोघेही तिच्या सुरक्षिततेबाबत अधिक जागरूक झाले आहेत. अलीकडे प्रियंका ‘नॉट स्किनी बट नॉट फॅट’ या पॉडकास्टमध्ये सहभागी झाली होती. यावेळी तिने सांगितले की, मालती जसजशी मोठी होत आहे, तसतसे आम्ही तिचे आयुष्य शक्य तितके सामान्य ठेवण्याचा प्रयत्न करत आहोत. आम्हाला नको आहे की तिचे फोटो किंवा व्हिडिओ कोणीतरी परवानगीशिवाय काढावेत किंवा सोशल मीडियावर शेअर करावेत. Priyanka Chopra and daughter Malti यावेळी प्रियंकाने एक धक्कादायक अनुभवही सांगितला. एकदा मालती शाळेतून घरी येत असताना एक अनोळखी व्यक्ती तिचा पाठलाग करत होती आणि तिचा व्हिडिओ बनवत होती. ही घटना लक्षात आल्यानंतर प्रियंका आणि निक अधिक सावध झाले. त्या दिवसानंतर जेव्हा जेव्हा मालती घराबाहेर जाते, तेव्हा तिच्यासोबत सुरक्षा रक्षक असतात. मुलीच्या सुरक्षिततेबाबत कोणतीही तडजोड करायची नाही, असे प्रियंकाने स्पष्ट केले. प्रियंका म्हणाली की, सार्वजनिक जीवन निवडण्याचा निर्णय तिने स्वतः घेतला आहे. त्यामुळे तिच्या आयुष्यातील गोष्टी लोकांसमोर येणे स्वाभाविक आहे. मात्र मुलगी मालतीला भविष्यात स्वतःचे निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार असावा, असे तिला वाटते. त्यामुळे सध्या तरी ती मुलीचे खासगी आयुष्य जपण्याचा प्रयत्न करत आहे. दरम्यान, प्रियंका चोप्रा तिच्या आगामी प्रोजेक्ट्समुळेही चर्चेत आहे. नुकतीच तिची ‘द ब्लफ’ ही समुद्री चाच्यांवर आधारित अॅक्शन फिल्म प्रदर्शित झाली. तसेच ती लवकरच दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांच्या ‘वाराणसी’ या भव्य चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात अभिनेता महेश बाबू आणि पृथ्वीराज सुकुमारन यांचीही महत्त्वाची भूमिका आहे. हा टाइम ट्रॅव्हलवर आधारित साहसी चित्रपट असून त्याचे बजेट सुमारे १३०० कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते. हा चित्रपट एप्रिल २०२७ मध्ये प्रदर्शित होणार आहे. याशिवाय प्रियंका ‘सिटाडेल’ या लोकप्रिय वेब सिरीजच्या दुसऱ्या सिझनमध्येही दिसणार आहे. कामाच्या व्यस्त वेळापत्रकातही प्रियंका आपल्या मुलीच्या सुरक्षिततेला आणि खासगी आयुष्याला सर्वाधिक महत्त्व देत असल्याचे या मुलाखतीतून स्पष्ट झाले आहे.