अबब! राजामौलींच्या चित्रपटासाठी प्रियंकाने घेतले तब्बल ‘एवढे’ मानधन, ठरली सर्वात महागडी अभिनेत्री

Priyanka Chopra: अभिनेत्री प्रियंका चोप्रा ही दिग्दर्शक एसएस राजामौली यांचा आगामी चित्रपट ‘एसएसएमबी29’ मध्ये झळकणार आहे. गेल्याकाही दिवसांपासून कलाकारांच्या भूमिकेमुळे हा चित्रपट चर्चेत आहेत. या चित्रपटात प्रियंका अभिनेता महेश बाबूसोबत काम करताना पाहायला मिळेल. ‘एसएसएमबी29’ माध्यमातून प्रियंका जवळपास 6 वर्षांनी बॉलिवूड चित्रपटांमध्ये पुनरागमन करणार आहे. विशेष म्हणजे यासाठी तिने प्रचंड मानधन देखील घेतले आहे.
प्रियंकाने ‘एसएसएमबी29’मध्ये काम करण्यासाठी तब्बल 30 कोटी रुपये मानधन घेतल्याचे सांगितले जाते. प्रियंकाने भूमिकेसाठी यापेक्षाही अधिक रक्कमेची मागणी केली होती. मात्र, निर्माते व अभिनेत्रीमधील चर्चेनंतर मानधन 30 कोटी रुपये ठरल्याचे सांगितले जाते.
यासोबतच, ती एका चित्रपटासाठी सर्वाधिक मानधन घेणारी भारतीय अभिनेत्री ठरली आहे. प्रियंकाच्या भूमिकेमुळे या चित्रपटाला परदेशातही चांगला प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
राजामौली यांचा एसएसएमबी29’ हा चित्रपट अॅक्शन-अॅडव्हेंचर असणार आहे. दोन भागांमध्ये रिलीज होणाऱ्या चित्रपटाचे बजेट 1000 कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते. चित्रपटाचा पहिला भाग वर्ष 2027 आणि दुसरा भाग वर्ष 2029 मध्ये रिलीज होण्याची शक्यता आहे.
या चित्रपटामध्ये प्रियंका, महेश बाबूसोबतच जॉन अब्राहम देखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. यापूर्वी चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेता पृथ्वीराज सुकुमारनची प्रमुख भूमिका असणार होती. मात्र, आता पृथ्वीराज सुकुमारन या चित्रपटातून बाहेर पडला असून, त्याच्याजागी बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहमची वर्णी लागली आहे.





