प्रियंका-अखिलेश आमने-सामने; कार्यकर्त्यांची घोषणाबाजी

लखनौ – उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीसाठी सर्व पक्षांकडून जोरदार प्रचार सुरु आहे. राजकीय नेत्यांकडून रोड शो काढण्यात येत असून गुरुवारी अखिलेश यादव आणि प्रियंका गांधी आमने-सामने आले. दोन्ही नेत्यांचे रोड-शो एकाच वेळी पोहोचले आणि कार्यकर्त्यांनी घोषणा देण्यास सुरुवात केली.
यावेळी प्रियंका गांधी आणि अखिलेश यादव यांनी राजकीय मतभेद बाजूला ठेवत एकमेकाला नमस्कर केला. विशेष म्हणजे दोन्ही नेत्यांनी ट्विटरलाही हा क्षण शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये प्रियंका गांधी समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्याकडे हास्यमुद्रेने नमस्कार करताना दिसत आहे.
यावेळी अखिलेश यादव हे राष्ट्रीय लोक दलाचे प्रमुख जयंत चौधरी यांच्यासोबत रथामध्ये होते. प्रियंका गांधी यांनी नमस्कार केल्यानंतर अखिलेश यादव आणि जयंत चौधरी यांनीही त्यांना नमस्कार केला. तसेच नंतर रथाच्या वरती आल्यानंतर पुन्हा एकदा हात दाखवला.
यावेळी समाजवादी पक्ष आणि कॉंग्रेसचे कार्यकर्ते घोषणाबाजी करत झेंडे फडकावत होते.
एकमेकांसमोर आल्याचा फोटो ट्विट करत अखिलेश यांनी, “एक दुआ-सलाम ~ तहज़ीब के नाम’ या कॅप्शनसहीत पोस्ट केला. या ट्विटला प्रियंका गांधी यांनीही उत्तर देत “तुम्हालाही आमच्याकडून राम-राम’ असे म्हटले आहे.





