Priyadarshini Mattoo Case : प्रियदर्शनी मट्टू हत्या प्रकरणातील दोषीला कोर्टाकडून दिलासा; काय आहे नेमकं प्रकरण?

नवी दिल्ली : प्रियदर्शिनी मट्टू हत्याकांड प्रकरणात आपला निकाल देताना दिल्ली उच्च न्यायालयाने दोषीची मुदतपूर्व सुटका करण्याची याचिका फेटाळण्याचा निर्णय रद्द केला. दिल्ली उच्च न्यायालयाने शिक्षा पुनरावलोकन मंडळाला म्हणजे एसआरबीला दोषीच्या अपीलावर पुनर्विचार करण्यास सांगितले आहे. दोषी संतोष कुमार सिंह हा १९९६ मध्ये कायद्याच्या विद्यार्थिनी प्रियदर्शिनी मट्टूवर बलात्कार आणि हत्या केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. दिल्ली उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती संजीव नरुला यांनी १४ मे रोजी संतोष कुमार सिंह याच्या याचिकेवर आपला निर्णय राखून ठेवला होता.
संतोष सिंह याच्यात सुधारणोची भावना आहे आणि आम्ही मुदतपूर्व सुटकेसाठी दोषीच्या याचिकेवर नव्याने विचार करण्यासाठी प्रकरण शिक्षा पुनरावलोकन मंडळाकडे परत पाठवले आहे असे न्यायालयाने नमूद केले. न्यायालयाने कैद्यांच्या याचिकांवर विचार करताना एसआरबीने पाळण्यासाठी काही मार्गदर्शक तत्त्वे देखील तयार केली आहेत. न्यायालयाने म्हटले आहे की एसआरबीने त्यांच्या याचिकांवर विचार करताना दोषींचे मानसिक मूल्यांकन करावे, जे या प्रकरणात केले गेले नाही.
दिल्ली उच्च न्यायालयात दोषी संतोष सिंगच्या वतीने उपस्थित असलेले वकील मोहित माथूर यांनी असा युक्तिवाद केला होता की त्यांच्या अशिलाचे वर्तन समाधानकारक आहे, जे त्याच्या सुधारणेचे संकेत देते. आणि भविष्यात गुन्हा करण्याची त्याची शक्यता पूर्णपणे संपली आहे. दिल्ली उच्च न्यायालयात युक्तिवाद करताना त्यांनी असेही म्हटले होते की संतोष सिंग अनेक वर्षांपासून खुल्या तुरुंगात आहे आणि तो समाजासाठी उपयुक्त व्यक्ती बनू शकतो.
काय आहे प्रियदर्शिनी मट्टू हत्या प्रकरण ?
जानेवारी १९९६ मध्ये २५ वर्षीय प्रियदर्शिनी मट्टूवर बलात्कार करून हत्या करण्यात आली होती. दिल्ली विद्यापीठात शिकणारा कायद्याचा विद्यार्थी संतोष कुमार सिंगला या प्रकरणात आरोपी मानले गेले होते. परंतु ३ डिसेंबर १९९९ रोजी ट्रायल कोर्टाने संतोष कुमार सिंगला निर्दोष मुक्त केले. परंतु दिल्ली उच्च न्यायालयाने २७ ऑक्टोबर २००६ रोजी या प्रकरणात निकाल देताना प्रियदर्शिनी मुट्टू यांच्या हत्येसाठी संतोष कुमार सिंग याला दोषी ठरवले आणि त्याला मृत्युदंडाची शिक्षा सुनावली. दोषी संतोष कुमार सिंग हा माजी आयपीएस अधिकाऱ्याचा मुलगा आहे. संतोष कुमार सिंगने दिल्ली उच्च न्यायालयाच्या निकालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. सर्वोच्च न्यायालयाने २०१० मध्ये दोषी संतोष कुमार सिंग याची फाशीची शिक्षा जन्मठेपेत रूपांतरित केली. आता या त्याच्या शिक्षेचाही फेरविचार केला जाणार आहे.





