Prithviraj Chavan : ‘डिलिमिटेशन’साठी मोदींचा शरद पवारांच्या 8 खासदारांवर डोळा : पृथ्वीराज चव्हाण
Prithviraj Chavan : राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चेवर पृथ्वीराज चव्हाण यांचे वक्तव्य. डिलिमिटेशन विधेयकासाठी शरद पवारांच्या आठ खासदारांवर लक्ष असल्याचा दावा.

Prithviraj Chavan : राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाच्या चर्चेमागे राजकीय गणित असल्याचा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना परिसीमन (डिलिमिटेशन) विधेयक मंजूर करून घ्यायचे आहे.
त्यासाठी १५ ते १६ खासदारांच्या पाठिंब्याची गरज असल्याने शरद पवार यांच्या पक्षाच्या आठ खासदारांवर भाजपचा डोळा असू शकतो, असे चव्हाण म्हणाले.
केंद्र सरकार महिला आरक्षणाच्या नावाखाली परिसीमन विधेयक पुढे आणत असल्याचा आरोप त्यांनी केला. महिला आरक्षण विधेयक २०२३ मध्येच मंजूर झाले आहे. त्यामुळे सरकारचा मुख्य उद्देश परिसीमन असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. परिसीमन करताना दक्षिण भारतातील राज्यांवर अन्याय होऊ नये, हा महत्त्वाचा मुद्दा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, शरद पवार यांचा पक्ष एनडीएमध्ये सहभागी होईल, असे आपल्याला वाटत नसल्याचे चव्हाण म्हणाले. पवार यांनी नेहमीच फुले-शाहू-आंबेडकर विचारांची भूमिका मांडली आहे. मात्र, राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येऊन एनडीएमध्ये गेले, तर इंडिया आघाडीची ताकद कमी होईल आणि देशाच्या राजकारणावर त्याचा परिणाम होईल, असेही त्यांनी सांगितले.





