Prithvi Shaw : पृथ्वी शॉ कायद्यासमोर क्लीन बोल्ड ! कोर्टाने ठोठावला ‘एवढा’ दंड; काय आहे नेमकं प्रकरण?

मुंबई : युवा क्रिकेटपटू पृथ्वी शॉ पुन्हा एकदा खासगी कारणांमुळे चर्चेत आला आहे. सोशल मीडिया इन्फ्लुएंसर सपना गिल यांनी दाखल केलेल्या कथित विनयभंग प्रकरणात पृथ्वी शॉने कोर्टाच्या नोटिशीला उत्तर न दिल्याने डिंडोशी सत्र न्यायालयाने त्याला 100 रुपयांचा दंड ठोठावला आहे. कोर्टाने या प्रकरणाची पुढील सुनावणी 16 डिसेंबर 2025 पर्यंत पुढे ढकलली आहे.
नेमका वाद काय?
फेब्रुवारी 2023 मध्ये मुंबईतील एका उपनगरीय हॉटेलमध्ये सेल्फी काढण्यावरून पृथ्वी शॉ आणि सपना गिल यांच्यात वाद झाला होता. या वादानंतर सपना गिल आणि काही जणांवर शॉवर हल्ला केल्याचा आरोप ठेवत अटक करण्यात आली होती. जामीन मिळाल्यानंतर सपना गिलने पृथ्वी शॉ आणि त्याचा मित्र आशिष यादव यांच्याविरुद्ध कथित विनयभंगाची तक्रार दाखल करण्यासाठी एअरपोर्ट पोलीस ठाण्यात संपर्क साधला. मात्र, पोलिसांनी गुन्हा नोंदवला नाही. यानंतर गिलने अंधेरी मॅजिस्ट्रेट कोर्टात धाव घेत पोलिसांना शॉविरोधात एफआयआर दाखल करण्याचे निर्देश देण्याची मागणी केली. मॅजिस्ट्रेटने फक्त पोलीस चौकशीचे आदेश दिले.
कोर्टात काय घडलं?
मॅजिस्ट्रेटच्या आदेशाला आव्हान देत सपना गिलने एप्रिल 2024 मध्ये डिंडोशी सत्र कोर्टात फौजदारी पुनरीक्षण याचिका दाखल केली. कोर्टाने पृथ्वी शॉला याचिकेवर उत्तर देण्यासाठी अनेकवेळा नोटीस पाठवली, परंतु शॉने कोणतेही उत्तर दाखल केले नाही. मंगळवारी झालेल्या सुनावणीतही शॉने प्रतिसाद न दिल्याने कोर्टाने त्याला 100 रुपयांचा दंड ठोठावला. कोर्टाने म्हटले, “पृथ्वी शॉला शेवटची संधी देण्यात आली होती, तरीही त्याने उत्तर दाखल केले नाही. त्यामुळे त्याला दंडासह आणखी एक संधी दिली जात आहे.”
सपना गिलचे वकील काय म्हणाले?
सपना गिलचे वकील अली काशिफ खान यांनी सांगितले की, पृथ्वी शॉने वारंवार समन्सकडे दुर्लक्ष केले आणि टाळाटाळ केली. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी 16 डिसेंबर 2025 रोजी होणार आहे. पृथ्वी शॉच्या या प्रकरणामुळे त्याच्या क्रिकेट कारकिर्दीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. येत्या सुनावणीत तो कोणता पवित्रा घेतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





