Prince William Cricket : मुंबईच्या गल्ली क्रिकेटमध्ये ब्रिटनच्या राजकुमाराची दांडी गुल! प्रिन्स विल्यमला चिमुरडीने केले क्लीन बोल्ड
Prince William Cricket : वार्षिक ‘अर्थशॉट प्राइज’ पुरस्कार सोहळ्यात सहभागी होण्यासाठी आलेले ब्रिटनचे राजकुमार विल्यम आणि राजकुमारी केट मिडलटन यांनी गल्ली क्रिकेट खेळण्याचा आनंद घेतला.

Prince William Kate Middleton Play Gully Cricket With Sachin Tendulkar Mumbai Visit : ब्रिटनचे राजकुमार विल्यम आणि राजकुमारी केट मिडलटन हे शाही दाम्पत्य सोमवारी तीन दिवसांच्या विशेष भारत दौऱ्यावर मुंबईत दाखल झाले आहेत. वार्षिक ‘अर्थशॉट प्राइज’ पुरस्कार सोहळ्यात सहभागी होण्यासाठी आयोजित केलेल्या या दौऱ्यात, मुंबईत पोहोचताच त्यांनी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरसोबत गल्ली क्रिकेट खेळण्याचा मनमुराद आनंद लुटला. या खास क्षणांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
ढोल-ताशांच्या गजरात स्वागत अन् मुंबईच्या कुल्लड चहाचा आस्वाद –
दक्षिण मुंबईतील बॅलार्ड इस्टेट परिसरात या शाही पाहुण्यांचे पारंपरिक ढोल-ताशांच्या गजरात जोरदार स्वागत करण्यात आले. २०२४ मधील कर्करोगावरील यशस्वी उपचारानंतर राजकुमारी केट मिडलटन यांचा हा सर्वाधिक चर्चेत असलेला परदेश दौरा ठरणार आहे. कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचताच सचिन तेंडुलकरसोबत प्रिन्स विल्यम आणि केट मिडलटन यांनी सर्वप्रथम मुंबईच्या खास फक्कड कुल्लड चहाचा आस्वाद घेतला आणि उपस्थितांशी मनमोकळा संवाद साधला.
सचिनने समजावले गल्ली क्रिकेटचे नियम; भारतीय मुलीने प्रिन्स विल्यम यांना केले बोल्ड
Prince William, Sachin Play Gully Cricket with Mumbai Schoolchildren to Promote Green Cause | India
#sachintendulkar #princewilliam #cricket #masterblaster #britain #india #gullycricket #mumbai #live https://t.co/HgffSZABQN
— ANI (@ANI) November 16, 2026
चहापानानंतर प्रिन्स विल्यम आणि सचिन मैदानात उतरले. राजकुमार विल्यम यांनी सर्वप्रथम फलंदाजीसाठी स्ट्राईक घेतली असता सचिनने त्यांना गल्ली क्रिकेटचे अनोखे नियम समजावून सांगितले. मात्र, त्यानंतर दुसऱ्याच चेंडूवर एका भारतीय मुलीने प्रिन्स विल्यम यांचा त्रिफळा उडवत त्यांना क्लीन बोल्ड केले; विल्यम यांनीही हसतमुखाने हस्तांदोलन करत तिचे भरभरून कौतुक केले.
केट मिडलटन यांची चौफेर फटकेबाजी आणि पतीकडूनच झाल्या बाद –
राजकुमार बाद होताच सचिनने बॅट हाती घेतली आणि संपूर्ण परिसरात ‘सचिन-सचिन’चा जयघोष घुमला. त्यानंतर सचिनने राजकुमारी केट मिडलटन यांच्याकडे बॅट सोपवली. केट यांनी पती विल्यम यांच्या गोलंदाजीवर जोरदार फटका लगावून उपस्थितांची दाद मिळवली; मात्र काही चेंडूंनंतर विल्यम यांनीच केट यांना बाद करत हिशोब चुकता केला.
मुंबई मेट्रो प्रवास आणि बॉलिवूड कलाकारांची घेणार भेट –
क्रिकेटनंतर या दाम्पत्याने मुलींशी आणि ढोल-ताशा पथकाशी संवाद साधला. त्यांच्या कार्यक्रमात मुंबई मेट्रोमधून प्रवास आणि मंगळवारी होणाऱ्या पुरस्कार सोहळ्यानिमित्त लोकप्रिय बॉलिवूड कलाकारांशी भेटीचा समावेश आहे. ‘भारतात येऊन खूप आनंद झाला,’ अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना सोशल मीडियावर व्यक्त केल्या आहेत.





