पंतप्रधान नरेंद्र मोदींची नव्या संसद भवनाला अचानक भेट; कामगारांशी संवाद साधत कामाची केली पाहणी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अचानक नवीन संसद भवनाच्या इमारतीला भेट दिली. यावेळी त्यांनी इथल्या कामाची पाहणी तर केली. त्यासोबत त्यांनी तिथल्या कामगारांशी मोकळेपणाने गप्पा देखील मारल्या आहेत. याविषयीचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना पाहायला मिळत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कामगारांशी गप्पा मारताना त्यांना काही सूचना देखील दिल्या असल्याचे सांगण्यात येत आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहात येणाऱ्या सुविधांचा आढावा घेतला त्यांनी यावेळी घेतला. पंतप्रधान मोदींसोबत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला हेदेखील यावेळी उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 10 डिसेंबर 2020 रोजी नवी दिल्ली येथे एका कार्यक्रमात नवीन संसद भवनाची पायाभरणी केली. कार्यक्रमाला विविध राजकीय पक्षांचे नेते, कॅबिनेट मंत्री आणि विविध देशांचे राजदूत उपस्थित होते. नवीन संसदेच्या इमारतीचे क्षेत्रफळ 64,500 चौरस मीटर एवढे आहे.
केंद्र सरकारने 2019 मध्ये सेंट्रल व्हिस्टा पुनर्विकास प्रकल्प सुरू केला. या प्रकल्पात नवी दिल्लीतील इतर प्रकल्पांसह संसदेच्या नवीन इमारतीच्या बांधकामाचादेखील समावेश आहे.

नव्या इमारतीत लोकसभेच्या चेंबरमध्ये 888 आणि राज्यसभेच्या चेंबरमध्ये 384 जागा असतील. सध्याच्या संसद भवनाप्रमाणे यात मध्यवर्ती सभागृह असणार नाही.

संयुक्त अधिवेशनात लोकसभा कक्ष 1272 सदस्यांना सामावून घेण्यास सक्षम असेल. उर्वरित इमारतीत मंत्र्यांची कार्यालये आणि समिती कक्षांसह 4 मजले असतील.




