पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘G-20’च्या अध्यक्षपदाची सूत्रे ब्राझीलकडे केली सुपूर्त

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज “जी-20′ परिषदेच्या अध्यक्षतेची सूत्रे ब्राझीलचे अध्यक्ष लुइझ इन्सासिओ लुला दा सिल्वा यांच्याकडे सुपूर्त केली. भारतीय अध्यक्षतेच्याखाली झालेल्या परिषदेचा आढावा घेण्यासाठी नोव्हेंबरमध्ये आभासी माध्यमातून परिषद घेतली जावी असा प्रस्तावही त्यांनी ठेवला.
“जी-20’चे अध्यक्षपद ब्राझील यावर्षी डिसेंबरमध्ये अधिकृतपणे स्विकारणार आहे. पंतप्रधान मोदी यांनी “जी-20’च्या अध्यक्षपदासाठी ब्राझीलला पाठिंबा दर्शवला. “जी-20′ ने समोर ठेवलेल्या उद्दिष्टांबाबत प्रगती केली जाईल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. ब्राझीलकडून समर्पण, दूरदृष्टीने नेतृत्व केले जाईल आणि जागतिक एकता आणि समृद्धी पुढे नेली जाईल, असा आमचा अढळ विश्वास असल्याचे मोदी म्हणाले.
गेल्या दोन दिवसात सदस्यांनी आपले दृष्टिकोन मांडले, सूचना दिल्या आणि अनेक प्रस्ताव मांडण्यात आले. या प्रस्तावांचा पाठपुरावा केला जायला हवा. या प्रस्तावांना वेगाने सत्यात कसे उतरवले जाईल, हे देखील बघितले जायला हवे. यासाठी नोव्हेंबर महिन्यात आढाव्यासाठी एक आभासी माध्यमातील परिषद आयोजित करण्याचा प्रस्ताव आहे.’ असे मोदी म्हणाले.
याचबरोबर “जी-20’च्या परिषदेची सांगता झाल्याची घोषणाही मोदींनी केली. एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्यचा मार्ग सुखद असेल अशी आशा करून मोदींनी या अर्थाचा “स्वस्ति अस्तु विश्वस्य!’ हा संस्कृत श्लोक म्हटला. संपूर्ण जगात आशा आणि शांतता नांदो, असा या श्लोकाचा अर्थ आहे. “जी-20’ची पुढील शिखर परिषद नोव्हेंबर 2024 मध्ये रिओ दि जानेरो येथे होणार आहे.





