Narendra Modi : आंबा महोत्सवाला पंतप्रधान मोदी उपस्थित राहणार

नवी दिल्ली : दिल्लीकरांना अस्सल देवगड व रत्नागीरी हापूस आंब्याची चव चाखता यावी, यासाठी नवीन महाराष्ट्र सदनात आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव ३० एप्रिल ते १ मे (महाराष्ट्र दिन) दरम्यान होणार आहे. मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्राचे खासदार रविंद्र वायकर यांच्या अभिनव संकल्पनेच्या मध्यमातून दिल्ली येथे आयोजित करण्यात येणाऱ्या आंबा महोस्तवाच्या उद्घाटनास उपस्थित राहण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मान्यता दिली आहे.
ही अभिनव संकल्पना त्यांना आवडल्यामुळे त्यांनी या महोस्तावाच्या उद्घाटनास येण्याची तयारी दर्शवली आहे. उद्घाटन पंतप्रधान यांच्या हस्ते व्हावे यासाठी खासदार रविंद्र वायकर यांनी आज (सोमवारी) त्यांची भेट घेऊन निमंत्रण दिले. यावेळी पंतप्रधान यांनी प्रत्येक राज्यातील उत्पादित होणाऱ्या फळांना जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी राज्यांनी प्राधान्य देण्याची आवश्यकता आहे, असे मत व्यक्त केले.
कोकणातील देवगड व रत्नागिरीतील हापूस आंबा महाराष्ट्रात व देशभरात खूपच प्रसिद्ध आहे. कोकणातील शेतकऱ्याना विविध राज्यांमध्ये थेट बाजारपेठ उपलब्ध व्हावी, त्यांना जास्तीत जास्त नफा मिळावा, आंब्याच्या निर्यातीला अधिक चालना मिळावी, या उदात्त हेतूने खासदार रविंद्र वायकर यांनी दिल्ली येथील महाराष्ट्र सदनमध्ये ३० एप्रिल ते १ मे (महाराष्ट्र दिन) पर्यंत आंबा महोस्तवाचे आयोजन केले आहे.
या भेटी दरम्यान खासदार वायकर यांनी मुंबईतील पाण्याची वाढती मागणी लक्षात घेऊन गारगाई-पिंजाळ प्रकल्प पूर्ण करण्यात यावी अशी विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली, यावर रेन वाँटर हार्वेस्टिंग प्रकल्पाची जास्तीत जास्त व्याप्ती वाढवण्यावर अधिक भर देण्याची अवश्यकता आहे, असे मत व्यक्त केले. तसेच एम्सच्या धर्तीवर मुंबईत एक रुग्णालय सुरु करण्यात यावे यामध्ये कॅन्सर रुग्णांवर उपचाराची सुविधा करण्यात यावी, अशी विनंती पंतप्रधान यांच्याकडे केली. यावर त्यांनी सकारात्मकता दर्शवली.





