पंतप्रधान मोदींनी केले 65 लाख प्रॉपर्टी कार्डचे वाटप

Property cards – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी स्वामीत्व योजनेअंतर्गत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे 65 लाख स्वामीत्व प्रॉपर्टी कार्डचे वितरण केले. 12 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 50,000 हून अधिक गावांनी या कार्यक्रमात भाग घेतला. पीएम मोदी म्हणाले की, गेल्या पाच वर्षांत सुमारे 1.5 कोटी लोकांना प्रॉपर्टी कार्ड देण्यात आले आहेत. ग्रामीण भारत आणि तिथल्या अर्थव्यवस्थेसाठी हा दिवस महत्त्वाचा असल्याचे पंतप्रधान म्हणाले. एप्रिल 2020 मध्ये सुरू करण्यात आलेल्या स्वामीत्व योजनेचा मुख्य उद्देश खेड्यापाड्यात राहणाऱ्या लोकांना त्यांच्या मालमत्तेचे कायदेशीर अधिकार देणे हा आहे.
पीएम मोदी म्हणाले की, प्रॉपर्टी कार्डद्वारे लोकांना त्यांच्या जमिनी आणि घराचा कायदेशीर पुरावा मिळतो. यामुळे केवळ ग्रामीण भागातील विकासाला चालना मिळत नाही तर मालमत्तेचे अधिकार मिळून गरिबी कमी होण्यास मदत होते. मालमत्ता अधिकारांचा अभाव ही जगभरातील एक मोठी समस्या असून, ती सोडवणे आर्थिक विकासासाठी आवश्यक असल्याचेही ते म्हणाले.
हवामान बदल, पाणी टंचाई आणि आरोग्य संकट यासारख्या जागतिक आव्हानांचाही पंतप्रधानांनी उल्लेख केला. या समस्या सोडवण्यासाठी आणि गरिबी कमी करण्यासाठी मालमत्ता अधिकार महत्त्वाची भूमिका बजावतात, असे ते म्हणाले. स्वामीत्व योजनेंतर्गत, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून गावातील जमिनींचे सर्वेक्षण आणि मॅपिंग केले जाते, लोकांना त्यांच्या मालमत्तेचे कायदेशीर पुरावे प्रदान केले जातात. या योजनेद्वारे ग्रामीण भारतात पारदर्शकता आणि सक्षमीकरणाला चालना दिली जात आहे.





