पिनारयी विजयन यांच्या शपथविधी सोहळ्यानंतर पंतप्रधान मोदींचे ट्विट; म्हणाले…

थिरुवनंतपुरम – केरळच्या मुख्यमंत्रीपदी मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे नेते पिनारयी विजयन यांचा आज शपथविधी झाला. विजयन यांच्या नेतृत्वाखालील डाव्या लोकशाही आघाडी (एलडीएफ) चे सरकार केरळमध्ये सलग दुसऱ्यांदा सत्तेवर आले आहे. केरळमध्ये विधानसभेची निवडणूक 6 एप्रिल रोजी झाली होती आणि तब्बल दिड महिन्यानंतर नवीन सरकार सत्तेवर आले आहे.
पिनारयी विजयन यांनी केरळच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना ट्विटरद्वारे शुभेच्छा संदेश दिला आहे. पंतप्रधान मोदी लिहतात, “केरळच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याबाबत पिनारयी विजयन यांचे अभिनंदन. मुख्यमंत्री म्हणून ही त्यांची दुसरी टर्म असेल”
Congratulations to Shri @vijayanpinarayi Ji on taking oath as CM and commencing his second term in office.
— Narendra Modi (@narendramodi) May 20, 2021
दरम्यान, करोनाच्या साथीमुळे सर्व प्रतिबंधक नियमांचे पालन करून झालेल्या या शपथविधीच्या सोहळ्याला कॉंग्रेस आणि “युडीएफ’चे नेते अनुपस्थित राहिले. शपथविधीच्या सोहळ्याला उपस्थितांची संख्या मर्यादित राखण्यात यावी, अशी सूचना केरळ उच्च न्यायालयाने बुधवारी सरकारला दिली होती. त्यानुसार कमाल 500 लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली होती.
या समारंभात राज्यपाल आरिफ मुहम्मद खान यांनी विजयन आणि अन्य मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. केरळच्या इतिहासात पूर्ण पाच वर्षांच्या कार्यकाळानंतर पुन्हा विजयी झालेले विजयन हे पहिले मुख्यमंत्री आहेत. आज 21 मंत्र्यांनीही शपथ घेतली.
त्यामध्ये सीपीएम, सीपीआय, केसी (एम), जेडीएस, एनसीपी, डीकेसी आणि आयएनएल या पक्षांच्या आमदारांचा समावेश आहे. यापैकी केवळ दोनच मंत्र्यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. उर्वरित सर्वजण प्रथमच मंत्री झाले आहेत. तर तीन महिलांना प्रथमच मंत्रीपदाची संधी दिली गेली आहे.





