पितृपंधरवड्यामुळे भाज्यांचे भाव तेजीत; आवकच्या तुलनेत मागणी जास्त

पुणे – पितृपंधरवडा सुरू होताच भाज्यांना मागणी वाढली आहे. त्या तुलनेत आवक कमी होत असल्याने भाज्यांचे भाव तेजीत आहेत. नवरात्रोत्सव सुरू होईपर्यंत ही तेजी टिकून राहील, असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला. पितृपंधरवड्यात पित्र जेऊ घालण्यासाठी आळूची पाने, गवार, भेंडी, तांबडा भोपळा, काकडी, कारली आदी भाज्या केल्या जातात. या भाज्यांचे किरकोळ बाजारातील प्रति किलोचे भाव 100 रुपयांच्या पुढे गेले आहेत.
पावशेर भाजी खरेदीसाठी 25 ते 40 रुपये मोजावे लागत आहेत. पितृपक्षात नैवेद्यासाठी अनेक पदार्थ करण्याची प्रथा आहे. पितृपक्षाला प्रारंभ झाल्यापासून कारली, गवार, चवळई, भेंडी, तांबडा भोपळा, लाल देठ तसेच मेथीच्या मागणीत वाढ झाली आहे.
याविषयी आडतदार विलास भुजबळ म्हणाले की, पावसाने ओढ दिल्याने भाज्यांच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे, त्यातच परतीच्या पावसामुळे हाती आलेल्या फळभाज्यांच्या प्रतवारीवर परिणाम झाला आहे. पितृपंधरवड्यामुळे भाज्यांची मागणी वाढते, त्या तुलनेत आवक कमी होत असल्याने भावांत तेजी आहेत.
किरकोळ विक्रेते प्रकाश ढमढेरे म्हणाले की, घाऊक बाजारात आवक कमी असल्याने तेथे भावांत तेजी आली आहे. त्यामुळे किरकोळ बाजारात तेजी आहे. वाहतूक खर्च, हमाली, वजनात होणारी घट अशा विविध कारणांमुळे घाऊक बाजाराच्या तुलनेत किरकोळ बाजारात भाव जास्त असतो. ही तेजी पितृपंधरवड्यानंतर कमी होईल.
भाज्यांचे एक किलोचे भाव
कारले : 80 ते 100 रु.
गवार :120 ते 140 रु.
भेंडी : 100 ते 120 रु.
वांगी :100 ते 120 रु.
लाल भोपळा : 60 ते 80 रु.
बटाटा : 30 ते 40 रु.
काकडी : 60 ते 80 रु.
जुडीचे भाव
कोथिंबीर : 30 ते 50 रुपये
मेथी : 30 ते 40 रुपये
लाल देठ : 30 ते 40 रुपये
आळू : 10 ते 15 रुपये




