पुणे | वाहन चालकावर दबाव, पुराव्यांत छेडछाड

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – “कल्याणीनगर येथील अपघात प्रकरणात विशाल अग्रवाल यांच्या वाहन चालकावर तो स्वत: कार चालवत असल्याचे सांगण्यासाठी दबाव होता,’ असे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्ट केले आहे. पोलीस आयुक्तालयात गुरुवारी मुलाचे आजोबा आणि चालकाची चौकशी करण्यात आली. तेव्हा ही बाब उघड झाली. अपघातानंतर काही वेळातच हा प्रयत्न करण्यात आला होता, अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शुक्रवारी दिली.
पोलीस आयुक्तांनी सांगितले, “पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी घटनेबद्दल वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना खूप उशिरा माहिती दिली. आधी कलम ३०४(अ) नुसार एफआयआर झाल्यावर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना याची माहिती दिली गेली. यामुळे वरिष्ठ पोलीस अधिकारी आल्यावर त्यांनी दुसरे ३०४ कलमानुसार एफआयआर तयार केला. मात्र, न्यायालयात ३०४ (सदोष मनुष्यवध) चाच एफआयआर सादर केला गेला. कलम ३०४ हे सदोष मनुष्यवधाचे असून अजामीनपात्र आहे.
घटनेचे गांभीर्य बघून हे कलम वाढवले गेले. त्याच दिवशी आम्ही बाल न्यायमंडळापुढे “हा क्रुर गुन्हा आहे, यामुळे मुलाला सज्ञान म्हणून ट्रीट करावे तसेच त्याला रिमांड होमला पाठवावे,’ अशी विनंती केली. हे दोन्ही अर्ज फेटाळले. यामुळे आम्ही वरच्या न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय घेतला. अपिलामध्ये आम्हाला पुन्हा बाल न्यायमंडळाकडे जाण्यास सांगितले. त्यांनी अर्ज मान्य करुन पाच जूनपर्यंत रिमांड होमला रवानगी केली. तसेच सज्ञान म्हणून गुन्हा चालवावा याची बाल न्यायमंडळाकडून प्रक्रिया सुरू झाली आहे.
दरम्यान, इतर आरोपींना अटक करण्यात आली. काहींना तीन, तर काहींना चार दिवस पोलीस कोठडी मिळाली. गाडीचा अपघाताच्या गुन्ह्यात पुरावे तसेच तांत्रिक पुरावे कोणी नष्ट करण्याचा प्रयत्न केला का ? याची चौकशी सहायक पोलीस आयुक्तांमार्फत सुरू आहे. लहान मुलाला दारु देणे किंवा पालकांनी मुलाला गाडी देणे या सर्व बाबींवर गुन्हे शाखेकडून तपास सुरू आहे. या दोन्ही गुन्ह्यांचा तपास होऊन लवकरात लवकर न्याय मिळावा, असा प्रयत्न करण्यात येत आहे. या दोन्ही प्रकरणात स्पेशल कौन्सिलिंगची प्रक्रिया सुरू झाली.’
पोलीस आयुक्त म्हणाले…
– कारवाईत दबाव किंवा दिरंगाई झाली असे म्हणणे उचित नाही. परंतू सुरवातीच्या काळात कलम-३०४ का लावले नाही? आरोपीला सुविधा पुरविण्यात आली का? यावर पूर्णपणे चौकशी सुरू आहे.
– प्रत्यक्षदर्शींवर काही दबाव टाकला जात असेल, तर आम्ही संबंधित व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करू.
– रक्तनमुनातपासणी अहवाल अद्याप प्राप्त झाला नाही. तो रात्री उशिरापर्यंत येण्याची अपेक्षा आहे. पण, त्यावर आमची केस अवलंबून नाही.
– आरोपी मुलाला मद्याचे व्यसन आहे, असे बचाव पक्षाचेच म्हणणे आहे. पण, “त्याला कृत्याची जाणीव असतानाही त्याने हा अपघात केला,’ असे आमचे म्हणणे आहे.
सीसीटीव्ही फुटेज आणि कागदपत्रे जप्त
घरातून मुलगा बाहेर पडल्यानंतर अपघातापर्यंत सर्व सिक्वेंन्स तपासला जात आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. घरातून बाहेर पडताना सिक्युरिटी नोंदवहीत मुलगा गाडी घेऊन बाहेर पडल्याचे नमूद केले आहे. संबंधित कार हा मुलगाच चालवत होता. मात्र, त्याच्या जागी चालक दाखवण्याचा प्रयत्न केला गेला.
चालकानेही सुरुवातीला तसे सांगण्याचा प्रयत्न केला होत. यामुळे त्याच्यावर कोणाचा दबाव होता, हे ही तपासले जाणार आहे. यामुळे ज्यांनी ही बाब करण्याचा प्रयत्न केला, त्याच्यावर पुराव्यांशी छेडछाड केल्याचा गुन्हा दाखल केला जाईल, असे पोलीस आयुक्त म्हणाले.
व्हायरल व्हिडिओप्रकरणी कायदेशीर कारवाई
व्हिडिओच्या माध्यमातून मुलाविषयी संभ्रम पसरवण्याचा प्रयत्न केला जात होता. हा डिफ फेक व्हिडिओ मध्य प्रदेशातील देव निखरा नामक तरुणाने तयार केल्याचे पोलिसांनी शोधून काढले आहे.
तो मीम्स बनवण्यात तरबेज आहे. त्याने सध्याचा विषय बघून अल्पवयीन मुलावर मीम बनवला आहे. पोलीस त्याच्यावर कायदेशीर कारवाईच्या तयारीत आहेत. यासंदर्भात मुलाच्या आईने समाजमाध्यमांवर पोलिसांना आवाहन केले होते. .





