सरकारच्या प्रश्नाला उत्तर देण्याची तयारी : व्हाट्स ॲप

नवी दिल्ली – व्हाट्स ॲप कंपनीने ग्राहकाच्या माहिती विषयक धोरणात बदल केल्यामुळे टीका होत असताना या कंपनीने आमचे सर्व व्यवहार पारदर्शक असल्याचे म्हटले आहे. त्याचबरोबर यासंदर्भात सरकारने कुठल्याही शंका उपस्थित केल्या तर त्याचे स्पष्टीकरण देण्याची आमची तयारी आहे असे कंपनीने म्हटले आहे.
व्हाट्स ॲपचे प्रमुख विल कॅथकार्ट यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, आमची आता समाज माध्यम क्षेत्रात एकाधिकारशाही राहिलेली नाही. आम्हाला बरेच तुल्यबळ स्पर्धक निर्माण झाले असून आगामी काळात आम्हाला ग्राहक मिळविण्यासाठी आणि टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत.
कॅथकार्ट यांनी सांगितले की, आम्ही ग्राहकांच्या खाजगी माहितीबाबत संवेदनाशील आहोत. आगामी काळातही ग्राहकांचे संभाषण गुप्त राहिली याची आम्ही नैतीक आणि तांत्रिक काळजी घेत राहणार आहोत. व्हाट्स ॲपने आपला डेटा फेसबुकबरोबर शेअर करण्याची घोषणा केल्यानंतर बरेच ग्राहक सिग्नल आणि टेलिग्रामची निवड करीत आहेत. याबाबत ते म्हणाले की, आम्हाला स्पर्धक आहेत आणि ग्राहकांचा विश्वास मिळविण्यासाठी आणि टिकऊन ठेवण्यासाठी आम्हाला आगामी काळात प्रयत्न करावे लागणार आहेत.
दर्जेदार सेवेसाठी स्पर्धा आवश्यक असते आणि आम्ही स्पर्धेचे स्वागत करतो. त्यामुळे ग्राहकांना पर्याय मिळतात. काही दिवसापासून व्हाट्स ॲपचे बरेच ग्राहक सिग्नल आणि टेलिग्रामकडे वळले आहेत का असे विचारले असता त्यांनी नाही असे उत्तर दिले. त्यांचा आमच्यावर पूर्ण विश्वास आहे. ते आमची सेवा वापरत आहेत असा दावा त्यांनी केला.
यासंदर्भात सरकारकडून काही विचारणा झाली आहे का असे विचारले असता त्यांनी सांगितले की, आमची कामकाज करण्याची पद्धत अशी आहे की आम्ही सरकारच्या कोणत्याही प्रश्नाला उत्तर देण्याची सदैव तयारी ठेवलेली असते. ग्राहकांचे मेसेज व्हाट्सअप किंवा फेसबुक पाहू किंवा ऐकू शकत नाही असे त्यांनी स्पष्ट केले. भारतात व्हाट्स ॲप पेमेंट सिस्टम सुरू झालेली आहे. या नवीन धोरणाचा या सेवेवर काही परिणाम होईल का असे विचारले असता ते म्हणाले की व्हॉट्स ॲप पेमेंट यंत्रणेची प्रणाली पूर्णपणे वेगळी असल्यामुळे त्यावर काही परिणाम होणार नाही.





