Pimpri : शिक्षक आमदारकीसाठी इच्छुकांची तयारी सुरू

सोमाटणे : पुणे शिक्षक मतदार संघाची निवडणूक अजून दीड वर्षे दूर असली तरी आतापासूनच संपूर्ण पट्ट्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर आणि पुणे जिल्ह्यात इच्छुक उमेदवारांनी आपले राजकीय गणित मांडण्यास सुरुवात केली आहे. विविध गाठीभेटींमधून पक्ष नेतृत्वाचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे. शिक्षणाचे माहेरघर म्हणून देशभरात ओळखले जाणारे पुणे हे या मतदारसंघाचे प्रमुख केंद्र आहे. त्यामुळे कारभारी कोण होणार, हे ठरविण्याचे सत्तेचे सूत्र पुणेकरांच्या हातीच राहणार असल्याचे स्पष्ट दिसते आहे.
या मतदारसंघाचे विद्यमान आमदार काँग्रेसचे जयंत आसगावकर आहेत. मागील निवडणुकीत महाविकास आघाडीत ही जागा काँग्रेसच्या वाट्याला गेली होती. माजी मंत्री सतेज पाटील यांच्या प्रयत्नांनी आसगावकर यांचे तिकीट निश्चित झाले. थोरल्या व धाकट्या पवारांचा पाठिंबा मिळाल्याने त्यांची आमदारकी निश्चित झाली. उमेदवार न बदलण्याचा काॅंग्रेसचा इतिहास पाहता आसगावकर यांना पुन्हा उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. या मतदारसंघात पुणे जिल्ह्यातील मतदारांची संख्या इतर चार जिल्ह्यांच्या तुलनेत जवळपास दुप्पट आहे. त्यामुळे अंतिम निर्णय पुणेकरांच्याच हातात असणार आहे.
भाजपची भूमिका अद्यापही अस्पष्ट
महायुतीने या जागेसाठी तयारी सुरू केली आहे. महायुतीतील मित्र पक्षांनी तयारी सुरू केली असली तरी भाजपने अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. मात्र भाजप जेव्हा शांत असतो तेव्हा वादळ येते, असा इतिहास असल्याने अंतिम क्षणी मोठी खेळी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
नवीन चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता
या निवडणुकीत काही नवे चेहरेही रिंगणात उतरण्याची चिन्हे दिसून येत आहेत आहेत. मुख्यमंत्री सहायता निधी प्रमुख आणि एकनाथ शिंदे यांचे माजी ओएसडी मंगेश चिवटे यांनी नुकत्याच टप्पा वाढीच्या प्रश्नात शासन-शिक्षक यांच्यात मध्यस्थी करत तोडगा काढल्याने शिक्षक वर्गात त्यांची प्रतिमा उंचावली आहे. विनानुदानित कृती समितीचे उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे हे गेली २४ वर्षे अनुदानाच्या प्रश्नावर लढा देत आहेत. अनवाणी आंदोलन करून शिक्षकांचे लक्ष वेधून घेतले. भोसरी विधानसभा शिंदे गटचे प्रमुख संभाजी सिरसाट यांनी काही वर्षे शिवसेनेच्या तालमीत स्वतःला तयार केले असून, शिक्षकांसाठी प्रत्यक्ष कामे करून आपली ताकद सिद्ध केली आहे. माजी आमदार दत्ता सावंत यांनी अपक्ष उमेदवारीतून यापूर्वी यश मिळवले आहे. मी पक्षापेक्षा मतदारांवर विश्वास ठेवतो, असे सांगत पुन्हा अपक्ष लढण्याची भूमिका जाहीर केली आहे. याशिवाय काँग्रेसचे जयंत आसगावकर हे विद्यमान आमदार असून, त्यांच्या कामगिरीच्या आधारावर मतदार त्यांना पुन्हा संधी देतील का, हा प्रश्नही महत्त्वाचा आहे.
(उमेदवारांच्या प्रतिक्रिया)
माझ्या कार्यकाळात शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, संस्थाचालक आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना मी विधान भवनात वाचा फोडून न्याय मिळवून दिला आहे. जुनी पेन्शन हा माझा मुख्य अजेंडा असणार आहे.
– जयंत आसगावकर, आमदार (काँग्रेस)शिक्षकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी मी कटिबद्ध आहे. टप्पा वाढीचा मुद्दा शासन-शिक्षक यांच्यात संमंव्य साधून मार्गी लावला आहे.
– मंगेश चिवटे, मुख्यमंत्री सहायता निधी प्रमुखगेल्या २१ वर्षांपासून शिक्षकांच्या प्रश्नासाठी लढतो आहे. मला मिळणारा प्रतिसाद सकारात्मक असून, ही निवडणूक माझ्यासाठी निर्णायक ठरेल.
– खंडेराव जगदाळे, उपाध्यक्ष, विनानुदानित कृती समितीमी स्वतः शिक्षक असल्याने शिक्षकांचा प्रत्येक प्रश्न माझा आहे. शिंदे साहेबांच्या माध्यमातून अनेक प्रश्न सोडवले आहेत. यापुढेही जीवाचे रान करून प्रश्न मार्गी लावणार.
– संभाजी सिरसाट, शहरप्रमुख भोसरी (शिंदे गट)माझी लढाई चळवळीची आहे. मी नेहमीप्रमाणे अपक्ष म्हणूनच लढणार आहे. मतदारांवर माझा विश्वास आहे.
– दत्ता सावंत, माजी आमदारआम्ही युती पाळणारे आहोत. पक्ष ज्याला उमेदवारी देईल, त्याच्यासाठी आम्ही प्रामाणिकपणे काम करू.
– प्रदीप कंद, जिल्हाध्यक्ष, भाजप उत्तर





