Kartiki Yatra : कार्तिकी यात्रेच्या तयारीला वेग; ३० नोव्हेंबरपर्यंत कामे पूर्ण करण्याचे निर्देश
भाविकांसाठी एक हजार मोबाईल टॉयलेट, ४०० अतिरिक्त सफाई कर्मचारी; सुरक्षेसाठी १८० सीसीटीव्ही कॅमेरे बसविणार

आळंदी – श्रीक्षेत्र आळंदी येथे होणाऱ्या कार्तिकी यात्रा आणि संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्याच्या प्रशासकीय तयारीला वेग आला आहे. लाखो भाविकांच्या सोयीसाठी स्वच्छता, पाणीपुरवठा, आरोग्य, वाहतूक आणि सुरक्षा व्यवस्थेचे नियोजन करण्यात येत आहे.
यासाठी एक हजार मोबाईल टॉयलेट, ४०० अतिरिक्त सफाई कर्मचारी, १८० सीसीटीव्ही कॅमेरे आणि ७०० सीटीपीटी सीट्स उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. सर्व विभागांनी आपापली कामे ३० नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करावीत, असे निर्देश देण्यात आले. 4 डिसेंबर रोजी कार्तिकी यात्रा तर 6 डिसेंबरला संत ज्ञानेश्वर माऊलींचा संजीवन समाधी सोहळा संपन्न होणार आहे.
यासंदर्भात मंगळवारी (ता. १७) सकाळी ११.३० वाजता आळंदी नगरपरिषदेच्या सभागृहात उपविभागीय अधिकारी अनिल दौंडे यांच्या अध्यक्षतेखाली पूर्वनियोजन बैठक झाली. बैठकीस श्री संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थान समितीचे विश्वस्त, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे पोलीस उपायुक्त, आळंदी व दिघी पोलीस ठाण्यांचे वरिष्ठ अधिकारी, वाहतूक पोलीस विभागाचे अधिकारी,
आळंदीचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, मुख्याधिकारी, यात्रा व नियोजन समितीचे सभापती, सर्व नगरसेवक, नगरसेविका, विविध विभागांचे अधिकारी, आरोग्य, विद्युत, सार्वजनिक बांधकाम, परिवहन, पीएमपीएमएल, अन्न व औषध प्रशासनाचे प्रतिनिधी तसेच केळगाव व चऱ्होली ग्रामपंचायतींचे ग्रामसेवक उपस्थित होते.
यात्रेदरम्यान शहरातील प्रमुख रस्ते, मंदिर परिसर आणि दर्शनबारीमध्ये स्वच्छता राखण्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ तैनात केले जाणार आहे. भाविकांच्या सुरक्षिततेसाठी १८० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असून, ४०० बॅरिकेड्स आणि वॉच टॉवर उभारले जाणार आहेत. एक डिसेंबरपासून विशेष पोलीस बंदोबस्त तैनात केला जाणार आहे.
आरोग्य सुविधांसाठी दहा वैद्यकीय बूथ, रुग्णवाहिका, ऑक्सिजन बेड आणि औषधांचा साठा उपलब्ध ठेवण्यात येणार आहे. पिण्याच्या पाण्यासाठी चार ठिकाणी पाणी भरणा केंद्रे उभारली जाणार आहेत. वडगाव, चाकण, मरकळ आणि चऱ्होली रस्त्यांवरील खड्डे बुजविणे, वाहनतळांची दुरुस्ती, अतिक्रमणे हटविणे आणि वाहतुकीचे नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
महिलांसाठी हिरकणी कक्षात पाच हजार सॅनिटरी पॅड उपलब्ध करून देण्याचेही नियोजन आहे. इंद्रायणी नदीत सांडपाणी सोडले जाणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले.
बैठकीच्या शेवटी उपविभागीय अधिकारी अनिल दौंडे यांनी सर्व विभागांनी समन्वयाने काम करून नियोजित वेळेत सुविधा पूर्ण करण्याचे निर्देश दिले. मागील यात्रांमधील अनुभव लक्षात घेऊन यंदा भाविकांना कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी प्रशासनाने नियोजन करण्याचे आवाहन केले.
बैठकीला पत्रकारांना उपस्थित राहण्यास मनाई –
कार्तिकी यात्रा नियोजनाच्या महत्त्वपूर्ण बैठकीला पत्रकारांना उपस्थित राहण्यास मनाई करण्यात आल्याने पत्रकारांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली. लाखो भाविकांशी संबंधित स्वच्छता, आरोग्य, वाहतूक आणि सुरक्षेच्या विषयांवर चर्चा होत असताना माध्यमांना दूर ठेवणे योग्य नसल्याची भावना पत्रकारांनी व्यक्त केली. प्रशासनाने अशा बैठका पारदर्शक पद्धतीने घेऊन माध्यमांना माहिती देण्याची मागणीही पत्रकारांकडून करण्यात आली.





