सर्वपक्षीय उमेदवारांची तयारी

खेड-आळंदी मतदारसंघात जोरदार चर्चा; तिरंगी लढतीवर जवळपास शिक्‍कामोर्तब


खेड-आळंदी(197)

खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघातील राजकारण सध्यातरी शांत आहे. तर यंदा या मतदारसंघात तिरंगी लढत होणार असल्याचे चित्र आहे. सध्या तरी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पारडे तालुक्‍यात जड असून भाजप व शिवसेना कसा लढा देणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
या मतदारसंघात राष्ट्रवादीची ताकद असताना शिवसेनेला लॉटरी लागली होती. मात्र, ही परिस्थिती त्यावेळच्या निवडणुकीत होती ती यावेळी राहील, यात मोठी शंका आहे. कारण अनेक जणांची आश्‍वासने पूर्ण न झाल्याने मदत करणारे बाजूला झाले आहेत. त्यामुळे शिवेसनेपुढे या निवडणुकीत कडवे आव्हान असणार आहे. तालुक्‍यात भाजपने अगोदरच मुसंडी मारली आहे, त्यामुळे भाजपला जागा सुटणार का?

आघाडीकडे कॉंग्रेसमधील नेते खेडची जागा मागत असल्याने पक्षश्रेष्ठींच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ही जागा राष्ट्रवादीकडे असली, तरी ही जागा कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मागितली आहे. त्यातच या मतदारसंघात राष्ट्रवादीचा बोलबाला असल्याने ही जागा राष्ट्रवादीलाच सुटेल, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. पक्षाचे नेते शरद पवार यांनी नव्या चेहऱ्याला संधी देण्याचे सुतोवात केल्याने पक्षातील अनेक नवखे चेहरे उमेदवारीसाठी प्रयत्न करीत आहेत. ही जागा कॉंग्रेसला सुटली तरीही पर्याय उपलब्ध आहेत. शिवसेना-भाजप युती झाली, तर ती जागा कोणाला सुटणार, यावर गणिते अवलंबून असतील.

तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा कोणाला?
खेड-आळंदी मतदारसंघातील राजकीय गणिते ही तिसऱ्या आघाडीवर अवलंबून आहेत. ही तिसरी आघाडी राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना, भाजप आणि कॉंग्रेसमधील नाराज नेत्यांची आहे. ते ज्याच्या मागे उभे राहतील तो उमेदवार निवडून येणार यात शंका नाही. मागील निवडणुकीत असेच झाले होते. त्यामुळे यंदा ही ताकद कोणामागे उभी राहते हे लवकरच स्पष्ट होईल. मात्र तोपर्यंत “वेट अँड वॉच’ची भूमिका पार पाडावी लागेल.

तिसऱ्या आघाडीची अद्याप बैठक नाही
तिसऱ्या आघाडीची एकत्रीकरणाची बैठक अद्याप झाली नसल्याने नक्‍की कोण उमेदवार ठरवला आहे, याकडे लक्ष लागून आहे. ज्याला अपक्ष निवडणूक लढवायची आहे, त्याने त्याचे पत्ते अजून खुले केले नसल्याने त्यांच्यातही संभ्रम आहे. यावेळी गोरे व मोहिते यांच्या विरोधात आघाडी उभी राहणार का? या आघाडीतील नेत्यांना गोरे-मोहिते आपलेसे करणार हे अजूनही निश्‍चित झाले नाही. तथापी इच्छुक सर्वच आम्हालाच पक्षाचे तिकीट मिळणार या आशेवर असून निवडणुकीच्या तयारीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)