मुंब्रा दुर्घटनेचा प्राथमिक अहवाल समोर; दोन्ही लोकल ताशी ७५ किमी वेगाने धावत होत्या अन्…..; अपघाताला ‘तो’ प्रवासी जबाबदार?

Mumbra train accident preliminary report out : ९ जून रोजी मुंब्रा रेल्वे स्थानकावर लोकल रेल्वेमधून प्रवासी खाली पडून अपघाताच्या दुर्देवी घटना घडली होती. या घटनेनंतर सर्वत्र मोठी खळबळ उडाली होती. आता या घटनेचा प्राथमिक अहवाल समोर आला असून या अहवालात घटनेचे कारण नमूद करण्यात आले आहे. या घटनेनंतर सुरुवातीला दोन्ही लोकल रेल्वे शेजारून जात असताना प्रवाशांच्या बॅगा एकमेकांना घासून अपघात झाल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, समोर आलेल्या प्राथमिक अहवालात दोन्ही लोकल एकमेकांना घासल्या नाहीत, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
अहवालात काय?
९ जून रोजीच्या लोकल रेल्वे अपघाताच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हळहळला. या घटनेची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. आता लोकल अपघाताचा प्राथमिक अहवाल समोर आला असून, या अहवालानुसार, दोन्ही लोकल ट्रेनमध्ये अवघे 0.75 मीटरचे अंतर होते. विशेष म्हणजे, दोन्ही लोकल एकमेकांना घासल्या नाहीत, असे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.
अपघाताच्या घटनेच्या वेळी दोन्ही लोकल रेल्वे ताशी ७५ किमी वेगाने धावत होत्या. कसाऱ्यावरून येणाऱ्या लोकमध्ये एका प्रवाशाने दरवाजाजवळ उभं राहताना बाहेर हात काढला होता. त्याच्या खांद्यावर बॅगही होती. त्याच प्रवाशाचा तोल गेल्याने तो खाली पडला. यावेळी या प्रवाशाचा हात आणि बॅग इतर प्रवाशांना लागल्याने एकामागोमाग एक इतर प्रवासी खाली पडले, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
याच घटनेत शेजावरून धावणाऱ्या दुसऱ्या लोकलच्या दरवाज्यात उभ्या असलेल्या प्रवाशांनाही धक्का बसल्याने ते देखील खाली पडले असावेत, असे निरीक्षण या अहवालात नोंदविण्यात आले आहे.
हेही वाचा : ‘इराणचे युरेनियम साठे सुरक्षितच..’ ; पेंटागॉनचा गुप्त अहवाल लीक ; ट्रम्प म्हणाले,”हा ‘फेक’ अहवाल”





