Preeti Boxing Gold : ग्लास्गोच्या रिंगमध्ये प्रीती पवारचा ‘गोल्डन’ पंच! राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला बॉक्सिंगमध्ये मिळवून दिले पहिले सुवर्णपदक
Preeti Boxing Gold : भारताची महिला बॉक्सर प्रीती पवार (Preeti Pawar) हिने सुवर्णपदकाचा अंतिम सामना जिंकत भारताला बॉक्सिंगमधील पहिले सुवर्णपदक मिळवून दिले आहे.

Preeti Pawar Wins Gold Medal Boxing Womens Glasgow CWG 2026 : स्कॉटलंडमधील ग्लास्गो येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा २०२६ स्पर्धेत प्रीती पवारने भारतासाठी बॉक्सिंगमधील सुवर्णपदकांचे खाते उघडले आहे. प्रीतीने ५४ किलो वजनी गटात कॅनेडियन बॉक्सर स्कारलेट सवाना डेलगाडोचा ५-० अशा एकतर्फी पराभव करून सुवर्णपदक जिंकले. या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील भारताचे हे सहावे सुवर्णपदक आहे. प्रीतीने तिन्ही फेऱ्यांमध्ये वर्चस्व गाजवले आणि पाचही पंचांनी भारतीय बॉक्सरच्या बाजूने गुण दिले.
प्रीतीच्या विजेतेपदानंतर काही मिनिटांतच, जस्मिन लोम्बोरियाने बॉक्सिंगमधील भारताचे दुसरे सुवर्णपदक जिंकले. जस्मिनने महिलांच्या ५७ किलो वजनी गटाच्या अंतिम सामन्यात गतविजेती आणि तीन वेळा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेची विजेती असलेल्या नॉर्दर्न आयर्लंडच्या मायकेला वॉल्शचा पराभव केला.
तिन्ही राऊंडमध्ये उडवला प्रतिस्पर्ध्याचा धुव्वा –
#WATCH | Glasgow, Scotland: Indian boxer Preeti Pawar clinched gold medal in the Women’s 54kg category at Commonwealth Games pic.twitter.com/kyTW1fBBSf
— ANI (@ANI) August 1, 2026
अंतिम लढतीत प्रीती पवारने सुरुवातीपासूनच अचूक आणि जोरदार पंचांचा वर्षाव करत प्रतिस्पर्धी मुक्केबाज ‘डेलागाओ’ हिला सावरण्याची एकही संधी दिली नाही. तिसऱ्या अन् निर्णायक फेरीत तिने लगावलेले अचूक ‘लेफ्ट हुक’ आणि ‘राईट हँड’ पंच प्रेक्षकांची दाद मिळवून गेले. अंतिम मिनिटांत प्रतिस्पर्ध्याने पुनरागमनाचा प्रयत्न केला, पण प्रीतीच्या वेगवान आक्रमणापुढे तिचा निभाव लागला नाही आणि भारताने थेट सुवर्णपदकावर शिक्कामोर्तब केले.
Preeti, you have packed a golden punch for Bharat!
Heartiest congratulations on winning the Gold Medal in the Women’s 54 kg Boxing event at #Glasgow2026.
Your outstanding performance has made the nation proud. Keep shining!#Cheer4Bharat #CWG2026 pic.twitter.com/UgCQRXhyk8
— Kiren Rijiju (@KirenRijiju) August 1, 2026
१० बॉक्सर फायनलमध्ये; पदकांचा पाऊस पडणार –
प्रीतीच्या या ऐतिहासिक सुवर्णपदकामुळे १० व्या दिवशी भारताच्या अभियानाला धमाकेदार सुरुवात झाली आहे. आज बॉक्सिंगमध्ये तब्बल १० भारतीय बॉक्सर सुवर्णपदकाच्या शर्यतीत उतरणार आहेत. याशिवाय ॲथलेटिक्समध्येही भारताच्या आशा पल्लवित आहेत; १०,००० मीटरमध्ये रौप्य जिंकणारा गुलवीर सिंह ५,००० मीटरच्या फायनलमध्ये धावेल.
तसेच ट्रिपल जंपच्या फायनलमध्ये प्रवीण चित्रावेल व सेल्वा प्रभु थिरुमरण, आणि पोल वॉल्टच्या फायनलमध्ये देव मीना व कुलदीप कुमार पदकासाठी शर्थीचे प्रयत्न करतील.





