भर उन्हाळ्यात पावसाचा अंदाज

पुण्यात ढगाळ वातावरण कायम
पुणे – सध्या उन्हाळ्याची चाहूल लागण्याऐवजी राज्यात पुन्हा पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. येत्या दोन दिवसांत विदर्भात काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. उर्वरित राज्यात काही काळ ढगाळ हवामान राहणार आहे.
मार्चमध्ये कडक उन्हाळा सुरू होतो, पण यंदा मात्र अजूनही तो जाणवत नसल्याचे चित्र पुण्यात आहे. गेल्या आठवड्यात तर रात्रीच्या तापमानात घट होऊन गारठा जाणवत होता. त्यानंतर गेल्या दोन दिवसांपासून तापमान जरा वाढत असताना, मंगळवारी अचानक वातावरणात बदल होताना दिसला आहे. पुणे शहरातही आज दुपारी ढगाळ वातावरण होते.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, येत्या 48 तासांत विदर्भात अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात दिसून येणार आहे. याठिकाणी ढगाळ हवामान राहणार आहे. पुणे शहरात मंगळवारी ढगाळ वातावरण होते. कमाल तापमान हे 37 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान सुद्धा 18.1 अंश सेल्सिअस नोंदवले गेले.





