मणिपुर हिंसाचारग्रस्तांसाठी तात्पुरती प्रिफॅब्रिकेटेड घरे – मुख्यमंत्री एन बिरेन सिंह

इम्फाळ :- मणिपुरात हिंसाचारामुळे ज्यांची घरे उद्धवस्त झाली आहेत आणि जे लोक सध्या मदत छावण्यांमध्ये राहात आहेत, त्यांच्यासाठी त्यांच्या घरांच्या भागातच प्रिफॅब्रिकेटेड घरे तयार करून त्यांना दिली जात आहेत. ही तात्पुरती व्यवस्था आहे, त्यांच्यासाठी पक्की घरे नंतर बांधली जाणार आहेत अशी माहिती मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांनी दिली आहे.
ते म्हणाले की, इम्फाळ पुर्व जिल्ह्यात सज्वाल कारागृह परिसरात अशा प्रकारची तिनशे तात्पुरती घरे उभारण्यात आली असून ती संबंधीतांना हस्तांतरीत करण्यात आली आहेत. हिंसाचारग्रस्तांना मदत छावण्यात अडचणीच्या अवस्थेत राहावे लागू नये यासाठी ही तात्पुरती व्यवस्था आहे. अशा प्रकारची आणखी चारशे प्रिफॅब्रिकेटेड घरे लवकरच तयार करून ती संबंधीतांना दिली जातील असे ते म्हणाले.
ही घरे आधीच तयार केली जातात जागेवर त्याचे फक्त ऍसेम्ब्लिंग केले जाते. त्यामुळे ती पटकन उभी राहू शकतात. बिष्णुपुर, सवोंमबंग, थौबल येथे अशा र्पकारची एकूण सुमारे एक हजार घरे संबंधीतांना दिली गेली आहेत अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली.
कांगपोकपी, आणि चुराचुंदपुर जिल्हयातील अनेक हिंसाचार ग्रस्तांची घरे उद्धवस्त झाली आहेत त्यांच्यासाठीही मोठ्या प्रमाणावर घर बांधणी कार्यक्रम हाती घ्यावा लागणार आहे. त्यांनाही तात्पुरत्या स्वरूपातील घरे देण्यावर विचार सुरू आहे असे ते म्हणाले.



