Railway Accident : उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे बुधवारी संध्याकाळी भीषण रेल्वे अपघात घडला. ट्रेनच्या धडकेत पाच जणांचा जागीच मृत्यू झाला असून या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. (Railway Accident) ही घटना यमुनानगर झोनमधील करछना भागात घडली. रचना-भिरपूर रेल्वे मार्गावर हा अपघात झाला असून मृतदेह दूरवर फेकले गेल्याने अपघाताची तीव्रता लक्षात येते. मिळालेल्या माहितीनुसार, सायंकाळी सुमारे ६:१५ वाजण्याच्या सुमारास १२३१२ क्रमांकाच्या ट्रेनच्या लोको पायलट आणि गार्डला रुळावर एक मृतदेह दिसला. त्यांनी तत्काळ रेल्वे पोलिसांना माहिती दिली आणि ट्रेन थांबवण्यात आली. यानंतर काही वेळातच त्याच मार्गावरून जाणाऱ्या पुरुषोत्तम एक्सप्रेसची धडक बसून आणखी चार जणांचा मृत्यू झाला. (Railway Accident) घटनेची माहिती मिळताच जीआरपी आणि स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सर्व मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. मृतांमध्ये गिरिराज, आकाश, अजय आणि मुन्ना पासी यांचा समावेश असून ते फिरोजाबाद जिल्ह्यातील रहिवासी होते. ते कोलकात्याकडे जात असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, या दुर्घटनेचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून रेल्वे प्रशासनाकडून तपास सुरू आहे. या घटनेबद्दल मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दुःख व्यक्त केले आहे. (Railway Accident)