Pravin Gaikwad : हल्ल्यानंतर प्रवीण गायकवाड यांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया; म्हणाले…

सोलापूर : संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर अक्कलकोट येथे काही समाजकंटकांनी शाई फेकून हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यामागे हिंदुत्ववादी विचारधारेचा मोठा कट असल्याचा आरोप गायकवाड यांनी केला आहे. पोलिसांनी काही तरुणांना ताब्यात घेतले असून, त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. “माझ्यावर प्रेम करणाऱ्या बहुजन समाजाच्या कार्यकर्त्यांमुळे मी आज जिवंत आहे,” असे भावनिक उद्गार गायकवाड यांनी काढले.
हल्ल्यामागे कट, पोलिसांची अनुपस्थिती
अक्कलकोट येथे एका कार्यक्रमासाठी गेले असताना शिवधर्म फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी गायकवाड यांच्यावर शाई फेकून हल्ल्याचा प्रयत्न केला. यावेळी काही तरुणांनी त्यांच्याशी असभ्य वर्तन केले. गायकवाड यांना दुखापत झाली नसली, तरी या हल्ल्याने पुरोगामी कार्यकर्त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. गायकवाड म्हणाले, “डॉ. कलबुर्गी, कॉ. पानसरे आणि डॉ. दाभोळकर यांच्या हत्येमागील विचारधाराच माझ्यावर हल्ला करत आहे. ठरवून मारण्याचा कट होता का, याचा तपास सरकारने करावा. एवढ्या महत्त्वाच्या ठिकाणी पोलिस यंत्रणा का नव्हती?”
“ही शेवटाची सुरुवात”
सोलापूर येथे माध्यमांशी बोलताना गायकवाड यांनी ठामपणे सांगितले, “शिवराय, फुले, शाहू, आंबेडकर यांचा पुरोगामी विचार मी मांडतो, जो काहींना खटकतो. संभाजी ब्रिगेडचा विचार हा राज्यघटनेला अभिप्रेत असून, न्याय, समता आणि बंधुतेसाठी आहे. आमच्या संघटने बद्दल गैरसमज पसरवले जातात, पण हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी केलेला हल्ला मी निषेधणार नाही. मात्र, ज्यांनी हा कट रचला, त्यांना सांगतो, ही शेवटाची सुरुवात आहे. संभाजी ब्रिगेडची उत्तर देण्याची पद्धत सर्वांना माहीत आहे.”
“बहुजन समाजामुळे जिवंत”
गायकवाड यांनी बहुजन समाजाच्या कार्यकर्त्यांचे आभार मानले. ते म्हणाले, “हल्ल्याच्या वेळी माझ्या सोबत असलेल्या कार्यकर्त्यांनी मला वाचवले. यापुढेही चांगले काम करण्याची संधी मला मिळेल, म्हणूनच मी आज जिवंत आहे.” त्यांनी सरकारला या प्रकरणाचा सखोल तपास करण्याची मागणी केली आहे.या हल्ल्याने पुरोगामी चळवळीतील कार्यकर्त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, याप्रकरणी पोलिस आणि प्रशासन काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





