Praveen Pardeshi : मुख्यमंत्री कार्यालयात प्रवीण परदेशींची लागणार वर्णी

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सचिवालय कार्यालयात निवृत्त सनदी अधिकारी प्रवीण परदेशी हे लवकरच मोठी जबाबदारी स्वीकारणार असल्याची माहिती समोर येत आहे. फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या पहिल्या कार्यकाळात म्हणजे 2014 रोजी प्रवीण परदेशी यांनी अतिरिक्त मुख्य सचिवपदाची जबाबदारी सांभाळली होती. यानंतर आता त्यांना मुख्यंत्र्यांच्या सचिवालय कार्यालयात मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून जबाबदारी देण्यात येणार आहे.
निवृत्त सनदी अधिकारी प्रवीण परदेशी हे देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतले आणि जवळचे मानले जातात. या दोघांचे खास संबंध आहेत. प्रवीण परदेशी यांच्या कामाबाबत देवेंद्र फडणवीस हे नेहमीच समाधानी राहिलेले आहेत. याचबरोबर, प्रवीण परदेशी यांनी मुंबई महापालिका आयुक्त म्हणून सुद्धा जबाबदारी सांभाळली होती. मात्र आता निवृत्तीनंतर प्रवीण परदेशी हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सचिवालय कार्यालयात मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून नवी जबाबदारी सांभाळणार आहेत.
प्रवीण परदेशी सध्या मित्रा या राज्य नियोजन संस्थेचे अध्यक्ष आहेत. राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी आणि राज्याची अर्थव्यवस्थेला गतीमान करण्यासाठी अनुभवी परदेशी यांची देवेंद्र फडणवीस यांच्या सचिवालय कार्यालयात मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून नियुक्त केले जाणार आहे.




