‘दोन टक्के काढून घेणाऱ्यांना टक्क्यातही ठेवणार नाही’; धनंजय मुंडेंचा मनोज जरंगेंवर हल्लाबोल

अहिल्यानगर : वंजारी समाजाला अनुसूचित जमाती मधील आरक्षणाचा लाभ मिळावा, यासाठी पाथर्डी-शेवगाव परिसरात युवकांचे उपोषण सुरू असताना माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे यांनी फोनवरून आंदोलकांशी संवाद साधला. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नेते अॅड. प्रतापराव ढाकणे यांच्या उपस्थितीत झालेल्या या संभाषणात मुंडे यांनी मराठा आरक्षण कार्यकर्ते मनोज जरंगे यांच्यावर नाव न घेता एका वाक्यात कठोर टीका केली.
आमचे दोन टक्के काढून घेणारे म्हणणाऱ्यांना टक्क्यात सुद्धा ठेवणार नाही, असा सूचक इशारा देऊन धनंजय मुंडेंनी वंजारी समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला पूर्ण पाठिंबा जाहीर केला.
या उपोषणाला भाजप नेते आणि अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील तसेच माजी खासदार सुजय विखे यांनी भेट दिली होती. त्यांनी आंदोलकांना १५ दिवसांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बैठक घेऊन तोडगा काढण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, या आश्वासनानंतरही युवकांचे उपोषण सुरूच राहिले.
यानंतर अॅड. प्रतापराव ढाकणे यांनी उपोषणस्थळावर भेट देऊन आंदोलकांशी चर्चा केली आणि थेट धनंजय मुंडे यांना फोन लावला. युवकांच्या मागणीची माहिती देत ढाकणे यांनी मुंडे यांना “आंदोलकांना समजावून सांगा,” असे सांगितले आणि फोन माईकसमोर धरला.
फोनवरून बोलताना धनंजय मुंडे यांनी वंजारी समाजाच्या लढ्याला ऐतिहासिक संदर्भ देत पाठिंबा दिला. ते म्हणाले, हैदराबाद गॅझेट निघाले नसते, तर आपण म्हणजेच वंजारी समाज, पाथर्डीमध्येच नाही, बऱ्याच ठिकाणी आणि इतर राज्यांमध्येही एसटीमध्ये आहोत हेच कळले नसते. आम्हाला अगोदरच माहिती होती की आपण एसटीमध्ये आहोत. कारण तेलंगणाच्या बॉर्डरजवळ परळी येते. लोकनेते गोपीनाथ मुंडे असल्यापासून सर्वांना माहिती आहे की, अनेक पाहुणे तिकडे एसटीमध्ये आहेत, तर आपण इकडे व्हीजे-एनटीमध्ये आहोत, असं धनंजय मुंडे म्हणाले.





