Ozar News: प्रशांत पादीर यांना तालुकास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार; मानसशास्त्रीय समुपदेशनात उल्लेखनीय कार्य
Ozar News: १४ वर्षांच्या उल्लेखनीय शैक्षणिक, मार्गदर्शक व सामाजिक कार्याची दखल

ओझर : रयत शिक्षण संस्थेच्या श्री बेल्हेश्वर विद्यामंदिर, बेल्हे येथील उपशिक्षक पादीर प्रशांत बबन यांना त्यांच्या १४ वर्षांच्या उल्लेखनीय शैक्षणिक, मार्गदर्शक व सामाजिक कार्याची दखल घेत तालुकास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
जुन्नर तालुका माध्यमिक शिक्षक संघ, जुन्नर तालुका शिक्षक लोकशाही आघाडी, जुन्नर तालुका माध्यमिक शिक्षिका संघ आणि जुन्नर तालुका सेवानिवृत्त माध्यमिक शिक्षक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सन्मानचिन्ह, प्रशस्तिपत्र, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते.
पादीर प्रशांत बबन यांनी इंग्रजी विषयाच्या अध्यापनात नाविन्यपूर्ण व विद्यार्थीकेंद्रित पद्धतींचा वापर करून विद्यार्थ्यांच्या भाषिक कौशल्यासोबतच आत्मविश्वास व संवादकौशल्य विकसित करण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. अध्यापनाबरोबरच विद्यार्थ्यांना व्यवसाय मार्गदर्शन व करिअरविषयक समुपदेशन देत त्यांच्या भविष्यातील शिक्षण व व्यवसायाच्या योग्य दिशा निवडण्यासाठी मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांच्या विविध शैक्षणिक, सामाजिक व वैयक्तिक अडचणी समजून घेत मानसशास्त्रीय समुपदेशनाच्या माध्यमातून त्यांना सकारात्मक दृष्टिकोन, आत्मविश्वास, निर्णयक्षमता आणि भावनिक आधार देण्याचे कार्य त्यांनी केले. विविध शैक्षणिक, सहशैक्षणिक व सामाजिक उपक्रमांतही त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे.
अध्यापक, व्यवसाय मार्गदर्शक आणि मानसशास्त्रीय समुपदेशक अशा बहुआयामी भूमिकेतून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेल्या कार्याची दखल घेत त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
या सन्मानाबद्दल विद्यालयाचे मुख्याध्यापक पडवळ राजेंद्र, पर्यवेक्षक खोरे दत्तात्रय, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य सुमित बोरचटे, प्रदीप पिंगट, गणेश चोरे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी पादीर प्रशांत बबन यांचे अभिनंदन केले.





