प्रशांत कोरटकर अखेर छत्रपती शिवरायांसमोर झुकला; व्हिडिओ शेअर करत म्हणाला…

Prashant Koratkar | इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना प्रशांत कोरटकरने फोन करून शिवीगाळ करत धमकी दिली होती. तसेच छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. यानंतर राज्यभरातून संतापाची लाट उसळली. त्यानंतर प्रशांत कोरटकर विरोधात राज्यातील विविध भागात गुन्हे दाखल झाले होते. मात्र काही दिवसांपासून फरार असलेल्या कोरटकरचा रविवारी एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यात कोरटकर छत्रपती शिवरायांसमोर नमल्याचे दिसत आहे.
व्हिडीओमध्ये कोरटकर छत्रपती शिवाजी महाराजांना हार घालून त्यांच्या चरणाशी नतमस्तक होताना दिसत आहे. यावेळी तो म्हणतो, ‘हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज यांच्या शोर्य कथा ऐकून आम्ही लहानाचे मोठे झालो. आजही त्यांच्या कथा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. अशाच शिवरायांना मी मानाचा मुजरा करतो, जय शिवराय, जय जिजाऊ,जय महाराष्ट्र’ असे वक्तव्य कोरटकरने व्हिडीओच्या माध्यमातून केले.
प्रशांत कोरटकरने पत्रात काय म्हटलं?
पत्रात प्रशांत कोरटकर म्हणाला, छत्रपती शिवाजी महाराज माझे प्रेरणास्त्रोत आहेत. महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज हे माझ्यासाठी सदैव वंदनीय, आदरणीय असेच आहेत, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हेही माझे प्रेरणास्त्रोत आहेत. शिवाजी महाराजांचे आपल्यावर अनंत उपकार आहेत आणि त्यासाठी मी नम्रतेने त्यांना नमस्कार व वंदन करत असतो.
शिवाजी महाराज एक आध्यात्मिक राजेच होते आणि ते ह्या महाराष्ट्राला लाभले हे आपले परम भाग्य. या भवानी मातेच्या पुत्राने असामान्य धैर्य आणि तलवार गाजवून स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली त्याला त्रिवार वंदन. परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम। धर्मसंस्थापनार्था य संभवामी युगे युगे ।। त्यासाठी निसर्ग आपली अलौकिक माणस निर्माण करतो, त्यातला एक परमोत्कर्ष बिंदू म्हणजे आपले शिवाजी महाराज होते.
पुढे पत्रात म्हंटले की, पुत्र कसा असावा हे आपण छत्रपती संभाजी महाराजांकडून शिकतो हे माझे त्यांच्या बद्दल चे स्वाभाविक विचार. छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या रायगडावर जाण्याचा मला अनेकदा योग आला आणि त्या निमित्ताने मी आणि माझ्या संपूर्ण कुटुंबांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना नमन केले आहे. आजच्या प्रसंगी मी छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आणि जिजाऊ मा साहेबांना मानाचा मुजरा करतो.”
कोरटकरला अंतरिम जामीन मंजूर
कोरटकर मागील पाच दिवसांपासून फरार असून, विविध ठिकाणी त्याचा शोध घेण्यात येत आहे. दरम्यान, शनिवारी प्रशांत कोरटकरला कोल्हापुरातील न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला. त्यामुळे कोरटकरला दिलासा मिळाला आहे. तर दुसरीकडे आजपासून सुरू होणाऱ्या विधीमंडळाच्या अधिवेशनात देखील कोरटकरचा मुद्दा वादळी ठरण्याची शक्यता आहे.
हेही वाचा:
जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादाविरुद्ध मोठी कारवाई ; पीओकेमधील तीन दहशतवाद्यांची मालमत्ता जप्त





