कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा अपमान करणे आणि इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी प्रशांत कोरटकरला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडीत सुनावली आहे. कोरटकरच्या जामीनासाठी कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी कोल्हापूर सत्र न्यायालयाने कोरटकरचा जामीन अर्ज फेटाळला आहे. सरकारी वकीलाने म्हटले, आरोपी कोरटकर हा पत्रकार असल्याचे सांगतो. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर एक माहितीपट तयार केला, असेही म्हणतो. मग, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याद्दल त्याचे विचार घृणास्पद कसे? आरोपीला मराठा आणि ब्राह्मण समाजात तेढ निर्माण करायचा आहे. तक्रारदार हे इतिहास संशोधक आहेत. आरोपीने सुरूवातीला मी कॉल केला नाही, असे म्हटले. पण, हा तांत्रिक बाबीचा आधार घेण्याचा अपयशी ठरलेला प्रयत्न आहे. पोलिसांनी केलेल्या तपासात कोरटकरने त्याच्याच मोबाईलवरून फोन केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे मोबाईल हॅक झाला, हा आरोपीचा दावा खोटा आहे, असा युक्तिवाद केला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाने प्रशांत कोरटकरचा जामीन अर्ज फेटाळला आहे. कोण आहे प्रशांत कोरटकर? प्रशांत कोरटकर गेल्या 25 वर्षांपासून नागपुरात पत्रकार म्हणून कार्यरत आहे. एका इलेक्ट्रॉनिक वाहिनीमध्ये विदर्भ ब्युरो चीफ होते. त्यानंतर एका दुसऱ्या न्यूज चॅनलला विदर्भ चीफ म्हणून काम केलं. त्यांनतर माझा विदर्भ नावाचे स्वतःचे युट्युब चॅनल काढलं. सध्या तो याच चॅनलचे मुख्य संपादक आणि मालक आहे. राज्यातील अनेक मोठ्या IAS, IPS अधिकाऱ्यांसोबत कोरटकर यांचे अत्यंत जवळचे संबंध आहेत. अनेक राजकीय नेत्यांसोबतही त्यांचे जवळचे संबंध आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत भेटीचे फोटो सोशल मीडिया वर पोस्ट करून त्यांच्या जवळचा असल्याचं सांगून मंत्रालयात अनेक काम (ट्रान्सफर, पोस्टिंग) केल्याचंही म्हटलं जातं.