Prashant Kishore : प्रशांत किशोर यांनी केले कुणाल कामराचे समर्थन

नवी दिल्ली : सध्या महाराष्ट्रात कॉमेडियन कुणाल कामराचे प्रकरण चांगलेच तापले आहे. सध्या यावरून सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले आहेत. तसेच, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या विडंबनामुळे कुणाल कामराच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. या वादात आता जनसुराज्य पक्षाचे नेते प्रशांत किशोर यांनी उडी घेतली आहे. यावेळी त्यांनी कुणाल कामराचे समर्थन केले असून तो देशाचा आणि देशाच्या संविधानाचा आदर करणारा व्यक्ती असल्याचेदेखील ते म्हणाले आहेत.
कुणाल कामराने शब्द चुकीचे वापरले असतील तर त्यांच्यावर कारवाई करायलाच हवी, असेही ते यावेळी म्हणाले आहेत. कुणाल कामराला पाठिंबा देत प्रशांत किशोर म्हणाले की, “कुणाल माझा चांगला मित्र आहे. जेवढ मला माहिती आहे, त्यावरून त्याचा कोणताही चुकीचा हेतू नव्हता. ज्यांना वाटते की कुणाल कामराने राजकीय भाष्य केले तर ते सपशेल चुकीचे आहेत, कारण तो असे करणार नाही, असे म्हणत त्यांनी समर्थन दर्शविले.
कुणाल कामरा पॉंडिचेरीमध्ये राहत असून तो सेंद्रिय शेती करतो. तसेच तो स्टँड-अप कॉमेडीदेखील करतो. त्याच्यामध्ये कोणतेही राजकीय शत्रुत्व नाही. तो अशा लोकांपैकी एक आहे ज्यांना त्यांच्या देशावर प्रेम आहे. कदाचित त्याने शब्द चुकीचे निवडले असतील. जर त्याने हे केले असेल तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. पण मी असे म्हणेन की, कुणाल कामरा हा देशाचा आणि देशाच्या संविधानाचा आदर करणारा आहे, असे म्हणत त्यांनी आपली बाजू मांडली.





