प्रशांत किशोर जमवणार 200 कोटी रूपयांचा निधी

पाटणा : निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांचा जन सुराज पक्ष लवकरच अस्तित्वात येणार आहे. नव्या राजकीय पक्षासाठी 200 कोटी रूपयांचा निधी जमवण्याचे उद्दिष्ट त्यांनी निश्चित केले आहे. पुढील वर्षीच्या अखेरीस बिहारमध्ये विधानसभा निवडणूक होईल. त्या निवडणुकीच्या माध्यमातून राजकीय रणांगण गाजवण्यास किशोर सज्ज होत आहेत.
मात्र, राजकीय पक्ष चालवण्यासाठी निधीचीही गरज असते. आर्थिक आघाडी किशोर कशी सांभाळणार, अशा चर्चाही झडत आहेत. त्या चर्चेला किशोर यांनी पत्रकारांशी बोलताना उत्तर दिले. प्रस्थापित पक्षांना प्रसंगी अवैध मद्य विक्री आणि वाळू उत्खननात गुंतलेले माफियाही देणग्या देतात. मात्र, आम्ही देणग्या मिळवण्यासाठी विकेंद्रीकरण व्यवस्थेचा अवलंब करू.
आम्ही बिहारमधील जनतेकडे केवळ प्रत्येकी १०० रूपये देणगी मागू. देणगीसाठी आम्ही २ कोटी लोकांपर्यंत पोहचू. निवडणुकीपर्यंत आम्ही निश्चित केलेल्या उद्दिष्टापेक्षा अधिक निधी मिळवू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. किशोर यांच्या पक्षामुळे बिहारमधील आगामी निवडणुकीची रंगत वाढेल असे संकेत आतापासूनच मिळत आहेत.





