पाटणा: बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी ‘जनसुराज’ पक्षाचे संस्थापक प्रशांत किशोर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. दोन मतदार ओळखपत्रे असल्याच्या आरोपावरून निवडणूक आयोगाने त्यांना नोटीस पाठवली असून, 3 दिवसांच्या आत स्पष्टीकरण देण्याचे निर्देश दिले आहेत. नेमके काय आहे प्रकरण? ‘जनसुराज’ पक्षाचे प्रमुख प्रशांत किशोर यांचे नाव दोन विधानसभा मतदारसंघांतील मतदार यादीत (बिहारमधील करगहर आणि पश्चिम बंगालमधील भवानीपूर) आढळल्याने त्यांच्यावर हा आरोप आहे. याप्रकरणी करगहर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांना नोटीस बजावली आहे. निवडणूक आयोगाने नोटीसमध्ये काय म्हटले? निवडणूक आयोगाने प्रशांत किशोर यांना पाठवलेल्या नोटीसमध्ये नमूद केले आहे की, २८ ऑक्टोबर २०२५ रोजी ‘इंडियन एक्सप्रेस’च्या कोलकाता-पाटणा आवृत्तीत प्रकाशित झालेल्या बातमीनुसार, त्यांचे नाव बिहार आणि पश्चिम बंगाल या दोन्ही राज्यांच्या मतदार यादीत नोंदवले गेले आहे. पश्चिम बंगाल: भवानीपूर मतदारसंघात मतदान केंद्र-संत हेलेन स्कूल, बी० रानीशंकरी लेन येथे त्यांचे नाव नोंदणीकृत आहे. बिहार: २०९ – करगहर विधानसभा मतदारसंघातील भाग संख्या-३६७ (मध्य विद्यालय, कोनार, उ० भाग) मधील क्र०सं०-६२१ मध्ये त्यांचे नाव आहे. करगहर मतदारसंघातील त्यांचे मतदार ओळखपत्र क्रमांक IUI3123718 आहे. नोटीसमध्ये पुढे म्हटले आहे की, लोकप्रतिनिधित्व अधिनियम, १९५० च्या कलम-१७ नुसार, एकापेक्षा जास्त मतदारसंघात कोणत्याही व्यक्तीची नोंदणी केली जाणार नाही. या कायद्याचे उल्लंघन केल्यास लोकप्रतिनिधित्व अधिनियम-१९५० च्या कलम-३१ नुसार, एक वर्षाचा कारावास, दंड किंवा दोन्ही शिक्षांची तरतूद आहे. त्यामुळे, एकापेक्षा जास्त मतदारसंघांमध्ये नाव नोंदणी करण्याच्या या प्रकरणावर तीन दिवसांच्या आत आपले म्हणणे लेखी स्वरूपात सादर करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत. बिहार निवडणुकीत प्रशांत किशोर चर्चेत बिहार विधानसभा निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या ‘जनसुराज’ पक्षाची जोरदार चर्चा आहे. जरी मुख्य लढत एनडीए (NDA) आणि महागठबंधन यांच्यात असली, तरी जनसुराज पक्षाच्या सभांना मोठी गर्दी होत असल्याने, हा पक्ष देखील निवडणुकीच्या रिंगणात सहभागी झाला आहे. त्यामुळे या प्रकरणात प्रशांत किशोर काय भूमिका घेतात आणि बिहारची जनता ‘जनसुराज’ला किती प्रतिसाद देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.